Join us

'मंजुमल बॉइज' फेम अभिनेता 'कुली' सिनेमात, त्याच्यावर केली 'अशी' कमेंट; ट्रोल होतायेत रजनीकांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:05 IST

रजनीकांत असं काय म्हणाले? नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले 'थलायवा'

अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'कुली' (Coolie) सिनेमा रिलीज होणार आहे. सध्या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये आमिर खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या सिनेमासाठी सर्वच स्टारकास्टने तगडं मानधन घेतलं आहे. 'मंजुमल बॉइज' सिनेमातील अभिनेता सोबिन शाहीरची (Sobin Shahir)  सुद्धा भूमिका आहे. सुरुवातील सोबिनला सिनेमात घेण्यासाठी रजनीकांत द्विधा मन:स्थितीत होते. त्यांनी सोबिनच्या डोक्यावर केस नाही अशी प्रतिक्रियाही दिली होती. यावर आता रजनीकांत ट्रोल होत आहेत.

नक्की काय घडलं?

'कुली' सिनेमासंबंधी एक इव्हेंट नुकताच पार पडला. दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या इव्हेंटमध्ये रजनीकांत यांनी भावना मांडताना सोबिन शाहीरच्या कामाचं कौतुक केलं. तसंच त्यांनी एक किस्साही सांगितला. ते म्हणाले, "या भूमिकेसाठी खरं तर लोकेशला फहाद फाजिलला कास्ट करायचं होतं. मात्र फहादच्या तारखा मिळाल्या नाहीत. म्हणून मग सोबिन शाहीरची निवड केली. मात्र मी कधी सोबिनचं काम पाहिलं नव्हतं. मी लोकेशला सोबिनने याआधी काय काम केलं असा प्रश्न विचारला. तेव्हा त्याने मला मंजुमल बॉइज सिनेमा केल्याचं सांगितलं. मी लोकेशला म्हटलं की याला टक्कल आहे. हा या भूमिकेत शोभून दिसेल का? पण लोकेशचा सोबिनवर विश्वास होता. म्हणून मी काही बोललो नाही. नंतर मी त्याचं काम पाहिलं. त्याने खरोखर अप्रतिम काम केलं आहे."

रजनीकांत यांनी सोबिनविषयी जी धारणा केली त्यावरुन आता ते ट्रोल होत आहेत. सोबिनला टक्कल आहे तर तो कसा शोभून दिसेल? असा रजनीकांत यांना प्रश्न पडला होता. 'तुमच्या डोक्यावर तरी कुठे केस आहे?' असा प्रश्न एका युजरने रजनीकांत यांना विचारला. रजनीकांत यांनी एका कलाकाराचं बॉडी शेमिंग केलं असाही अनेकजण आरोप करत आहेत.

कुली सिनेमा १४ ऑगस्ट रोजी रिलीज होणरा आहे. या सिनेमात रजनीकांत, नागार्जुन, आमिर खान,  श्रुती हसन, सत्यराज आणि उपेंद्र अशी तगडी स्टार कास्ट आहे. सर्वांनी कोटींमध्ये मानधन घेतलं आहे.  

टॅग्स :रजनीकांतTollywoodट्रोल