Rajinikanth Coolie OTT Release Date: सुपरस्टार रजनीकांत यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'कुली' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशीही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमावण्यासोबतच, 'कुली' ने ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही एक मोठा रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटाचे डिजिटल हक्क तब्बल १२० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. जो तमिळ चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक करार मानला जात आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार, रजनीकांतच्या 'कुली' चे डिजिटल हक्क अमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर किमान एक महिन्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो. त्यामुळे प्रेक्षकांना सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे. 'कुली'च्या या मोठ्या करारामुळे निर्मात्यांना प्रचंड फायदा झाला आहे.
७४ वर्षीय रजनीकांत यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमत्कार करत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६५ कोटी रुपयांची दमदार ओपनिंग केली होती. पाचव्या दिवसापर्यंत, 'कुली' ने एकूण १९४.८८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे ३५० कोटी रुपये असून आतापर्यंत अर्ध्याहून अधिक बजेट वसूल केले आहे. रजनीकांतसोबतच या चित्रपटात आमिर खान, नागार्जुन आणि श्रुती हासन सारखे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. आमिर खान आणि नागार्जुन यांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहे.