Rajinikanth Coolie First Review Out: सध्या मनोरंजनविश्वात 'कुली' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. रजनीकांत, नागार्जुन, आमिर खान, श्रुती हसन, सत्यराज आणि उपेंद्र अशी तगडी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट उद्या १४ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं सगळेजण कौतुक करताना दिसत आहेत. लोकेश कनगराज दिग्दर्शित या चित्रपटाविषयी लोकप्रिय अभिनेते व राजकारणी उदयनिधी स्टॅलिन यांनी खास पोस्ट शेअर करत भरभरुन कौतुक केलं आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी त्याच्या X वर (पुर्वीचे ट्विटर) 'कुली' चित्रपटाबाबत पोस्ट लिहून त्यांना हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितलं आहे. या ट्विटमध्ये रजनीकांत यांचं अभिनंदन करत त्यांनी लिहलं, "चित्रपटसृष्टीत ५० गौरवशाली वर्षे पूर्ण केल्याबद्दल आपल्या सुपरस्टार रजनीकांत यांचे अभिनंदन करताना मला खरोखर आनंद होत आहे. उद्या प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपटाची झलक पाहण्याची संधी लवकर मिळाली. मला या पॉवर-पॅक्ड मास एंटरटेनर पाहून खूप आनंद झाला आणि मला खात्री आहे की तो सर्व प्रेक्षकांची मने जिंकेल", असं त्यांनी म्हटलं. यासोबत त्यांनी अभिनेता आमिर खान, नागार्जून, अनिरुद्ध रवीचंद्र, उपेंद्र, श्रुती हासन आणि चित्रपटातील संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरला ५० वर्षे पूर्ण झाली. या ५० वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त 'कुली' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच जगभरात ५५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट उद्या गुरुवार १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून त्याचवेळी ह्रतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांचा 'वॉर २' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत.