Ed Summons Mahesh Babu In Money Laundering Probe: लोकप्रिय अभिनेता महेश बाबू अडचणीत सापडला आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात त्याला सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. ईडीने अभिनेत्याला २७ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. हैदराबादमधील साई सुर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप दोन कंपन्या बेकायदेशीर व्यवहार करत होत्या. या दोन्ही कंपन्यांचा महेश बाबूचा प्रवक्ता असल्याचे म्हटले जात आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
भाग्यनगर प्रॉपर्टीज लिमिटेडचे नरेंद्र सुराणा आणि साई सूर्या डेव्हलपर्सचे सतीश चंद्र गुप्ता यांच्याविरुद्ध तेलंगणा पोलिसांकडून नोंदवण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. या दोघांनी लेआउटमधील एकच भूखंड अनेक वेळा विकून खरेदीदारांना फसवलं आणि नोंदणीबाबत खोटे आश्वासनेही दिली. १६ एप्रिल रोजी ईडीने सुराणा ग्रुपचे प्रमुख नरेंद्र सुराणा आणि साई सूर्या डेव्हलपर्स यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. ईडीने यांच्या घरातून कागदपत्रे आणि रोख रकमेच्या स्वरुपात पुरावे जप्त केले आहेत.
महेशने साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपने सुरू केलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांची जाहिरात केली. यासाठी त्याला ५.९ कोटी रुपये मिळालेत. यात ३.४ कोटी रुपये चेकद्वारे आणि २.५ कोटी रुपये रोख स्वरूपात मिळाले. महेशचा संपूर्ण देशभरात चाहतावर्ग असल्यानं अनेकजण जाहिरात पाहिल्यावर आकर्षित झाले आणि गुंतवणूक केली. महेश बाबूला या घोटाळ्याबाबत माहिती नसली किंवा तो या घोटाळ्यात सहभागी नसला तरी त्याला कंपन्यांकडून जाहिरातींसाठी पैसे मिळाले आहेत. त्याच पैशांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने महेश बाबूला समन्स बजावले आहेत. महेश बाबूने अद्याप ईडीने पाठवलेल्या नोटीसीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता अभिनेता यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.