सध्या बॉक्स ऑफिसवर एका सिनेमाची चांगलीच हवा आहे. हा सिनेमा म्हणजे 'महावतार नरसिंह' (Mahavatar Narsimha). 'महावतार नरसिंह' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या बिग बजेट सिनेमांना मागे सोडलं आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण गर्दी करत आहेत. भगवान विष्णुच्या नरसिंह अवतारावर हा सिनेमा आधारीत आहे. हिंदू देवावर आधारित चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला मुस्लिम प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. असा अनपेक्षित आणि हृदयस्पर्शी प्रतिसाद पाहून दिग्दर्शक आश्विन कुमार यांनी आनंद व्यक्त केलाय.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी चित्रपटाला मिळणाऱ्या प्रचंड यशाबद्दल आणि मुस्लिम समुदायातील प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खुलासा केला.ते म्हणाले, "विविध समुदायातील लोक, ज्यात अनेक मुस्लिम प्रेक्षकांचा समावेश आहे. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की चित्रपटाने त्यांचा विश्वास मजबूत केला आहे".
अश्विन कुमार म्हणाले, "मी असं म्हणत नाहीये की तुम्ही तुमचा धर्म बदला. मला इतकंच सांगायचं आहे की आस्था काय असते, हे तुम्ही समजून घ्या. मग तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल किंवा सकारात्मक ऊर्जेवर किंवा ब्रह्मांडावर. त्या आस्थेसमोर तुम्ही स्वत:ला समर्पित करा, हेच या चित्रपटातून शिकायला मिळतं", असं त्यांनी म्हटलं.
'महावतार नरसिंह' हा होम्बाले फिल्म्स आणि क्लेम प्रॉडक्शनच्या 'दशावतार' फ्रँचायझीतील पहिला अॅनिमेशनपट आहे. भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित असलेल्या या फ्रँचायझीतील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'महावतार नरसिंह'नंतर 'महावतार परशुराम' पुढील वर्षी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर 'महावतार रघुनंदन' २०२९ मध्ये, 'महावतार धवकादेश' २०३१ मध्ये, 'महावतार गोकुळानंद' २०३३ मध्ये, 'महावतार कल्की भाग १' २०३५ मध्ये आणि 'महावतार कल्की भाग २' हा २०३७ मध्ये रिलीज होणार आहे.