गेल्या अनेक दिवसांपासून एका सिनेमाची भारतीय मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चा होती. हा सिनेमा म्हणजे 'ठग लाइफ'. काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये या सिनेमाचा ग्रँड म्युझिक लाँच सोहळा पार पडला होता. आता नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कमल हासन (kamal haasan) यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. इतकंच नव्हे तर मराठमोळे दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (mahesh manjrekar) या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
'ठग लाइफ'चा ट्रेलर
'ठग लाइफ'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, कमल हासन एका सुखी कुटुंबाचे प्रमुख असतात. ते एका लहान मुलाला दत्तक घेतात. पुढे हा मुलगा मोठा येऊन कमल हासन त्याला घराण्याचा पुढचा उत्तराधिकारी करतात. परंतु स्वार्थ आणि लोभापायी हा मुलगा कमल हासन यांच्या कुटुंबाला उद्धवस्त करुन त्यांच्याच जीवावर उठतो. त्यामुळे कमल हासन रौद्ररुप धारण करुन दत्तक घेतलेल्या मुलाच्या मागे लागतात. २ मिनिटांचा हा ट्रेलर अत्यंत उत्कंठावर्धक असून एका सीनमध्ये खलनायक झालेल्या महेश मांजरेकर यांची झलक पाहायला मिळते.
कधी रिलीज होणार सिनेमा
'ठग लाइफ' सिनेमात कमल हासन प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत सिलंबरासन टीआर (STR), त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज, अभिरामी, अशोक सेल्वन, महेश मांजरेकर आणि बॉलिवूड अभिनेता अली फजल झळकणार आहे. मणी रत्नम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ए.आर.रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. हा सिनेमा ५ जून २०२५ ला भारतात रिलीज होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.