Fan Builds Temple For Samantha Ruth Prabhu: सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने पदार्पणापासूनच लोकांची मने जिंकण्यास सुरुवात केली आणि आज ती तरुणाईमधील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती दिसायला सुंदर आहेच पण तिचा अभिनय सुद्धा तिच्या सौंदर्याला साजेसा असाच आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीसह समांथानं बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं आहे. तिची फॅन फॉलोइंग किती मोठी आहे हे सांगण्याची गरज नाही. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशातही समांथाचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता समांथा हिचा एक चाहता चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे या चाहत्याचं अभिनेत्रीवर इतके प्रेम आहे की त्याने चक्क तिचे मंदिर (Samantha Ruth PrabhuTemple) बांधले आहे.
समांथाच्या एका जबऱ्या चाहत्यानं आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील अलापाडू गावात तिचे मंदिर बांधले आहे. या मंदिरामध्ये त्याने समांथाची मूर्ती बसवली आहे. समांथाच्या या चाहत्याचं नाव संदीप असं आहे. नुकतंच समांथाचा २८ एप्रिल रोजी वाढदिवस झाला. तिच्या या खास दिवशी संदीपनेदेखील मंदिरात पूजा आणि केक कट केला. संदीपची पत्नी दीप्तीचा देखील यात सक्रिय सहभाग होता. सध्या समांथाच्या या चाहत्याची सगळीकडे चर्चा होत आहे.
समांथाबद्दल तो म्हणाला, "मी समांथाचा मोठा फॅन आहे. गेल्या तीन वर्षापासून मी समांथाचा वाढदिवस साजरा करत आलो आहे. समांथाची परोपकाराची वृत्ती मला खूप प्रेरणा देते". समांथाचा अभिनय आणि विशेषतः तिच्या 'प्रत्युषा सपोर्ट' या चॅरिटी फाउंडेशनमुळे संदीपच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आणि आदर निर्माण झाला. समांथा 'प्रत्युषा सपोर्ट'च्या माध्यमातून मुलांच्या हृदयविकाराच्या उपचारांसाठी मदत करते.
समांथाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'रक्त ब्रह्मांड'मध्ये पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूर आणि वामिका गब्बी देखील दिसणार आहेत. याआधी समांथा 'सिटाडेल हनी बनी'मध्ये पाहायला मिळाली होती. यासोबतच समांथा तिच्या आजारपणामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नाग चैतन्य याने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधली. तर दुसरीकडे समांथा मात्र एकटीच होती. मात्र, अशातच आता अभिनेत्री लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक राज निदिमोरू याला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, या चर्चांना अभिनेत्री किंवा राजनं दुजोरा दिलेला नाही.