Dhanush On Ranjhana Ai Climax: साउथ सुपरस्टार धनुषने २०१३ मध्ये आलेल्या 'रांझणा' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं होतं. अभिनेत्री सोनम कपूरसोबत त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि हा चित्रपट मोठा हिट ठरला. यातील गाणी, कलाकारांचा अभिनय सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं होतं. आजही 'रांझणा' ला बॉलिवूडच्या 'कल्ट' चित्रपटांमध्ये गणलं जातं. नुकतंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या साहाय्याने नवीन क्लायमॅक्ससह 'रांझणा' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
'रांझणा' चित्रपटाच्या शेवटी कुंदनचा मृत्यू हे दाखवण्यात आलेलं होतं. पण, आता कुंदनचा मृत्यू न होता तो पुन्हा जागा होतो असा क्लायमॅक्स दाखवण्यात आला. AIच्या मदतीने शेवट बदलण्यात आला आहे. 'रांझणा'च्या नवीन क्लायमॅक्सवर धनुषने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर लिहिलं, "रांझणाचा पुन्हा प्रदर्शित होताना एआय द्वारे बदललेला क्लायमॅक्स पाहून मला खूप वाईट वाटले आहे. हा तो चित्रपट नाही ज्यासाठी मी १२ वर्षांपूर्वी कठोर परिश्रम केले होते. असे वाटते की या नव्या क्लायमॅक्समुळे चित्रपटाचा आत्माच हरवला आहे. मी अक्षेप घेतल्यानंतरही हे बदल कायम ठेवण्यात आले, हे अधिक वेदनादायक आहे".
पुढे त्यानं म्हटलं, "चित्रपटाच्या मूळ विषयात, भावनिक ओघात किंवा एखाद्या दृश्यात एआय वापरून हस्तक्षेप करणं म्हणजे त्या कलाकृतीचा आत्मा नष्ट करणं आहे. हा स्पष्टपणे चित्रपटाच्या वारशासाठी धोका आहे. भविष्यात अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदे व्हावेत, अशी मी अपेक्षा करतो".
धनुषपूर्वी 'रांझणा'चे दिग्दर्शक आनंद एल. राय यांनीही नवीन क्लायमॅक्सवर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, 'रांझणा' हा चित्रपट ३६ कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता आणि त्याने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. तर, जगभरात चित्रपटाने सुमारे ९० कोटींचा गल्ला जमवला होता.