अभिनेत्रीने अनुष्का शेट्टी(Anushka Shetty)ने 'बाहुबली' चित्रपटातील 'देवसेना'च्या भूमिकेतून लोकांची मने जिंकली आणि प्रत्येकजण तिचा चाहता झाला. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले, पण आता तिच्या एका निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे. अनुष्का शेट्टीने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून, तिने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. 'घाटी' या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर तिने हा निर्णय घेतला आहे.
अनुष्का शेट्टीचे खरे नाव 'स्वीटी' आहे, पण रुपेरी पडद्यावर ती इतकी प्रभावी आहे की मोठे मोठे कलाकारही तिच्यासमोर फिके पडतात. चाहते तिला 'लेडी सुपरस्टार' म्हणून हाक मारतात, पण आता हीच सुपरस्टार सोशल मीडियापासून दूर जात आहे. अनुष्काने तिच्या 'X' (ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने सांगितले की, आता ती खऱ्या जगाशी पुन्हा जोडली जाण्यासाठी सोशल मीडियापासून दूर जात आहे. अनुष्काने लिहिले, 'मी ब्लू लाइटमधून कँडल लाइटच्या दिशेने जात आहे. काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर जात आहे, जेणेकरून मी खऱ्या जगाशी पुन्हा जोडली जाऊ शकेन. लवकरच परत येईन, आणखी कथा आणि भरपूर प्रेम घेऊन.'
चाहते झाले निराशअनुष्का शेट्टीने सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याने चाहते निराश झाले असले, तरी त्यांची आवडती अभिनेत्री खऱ्या जगात परतत असल्याचा त्यांना आनंदही झाला. एका चाहत्याने लिहिले, 'ओएमजी! तुम्ही खऱ्या जगात परत येत आहात, तुमची वाट पाहतोय, स्वीटी.' आणखी एका चाहत्याने ट्विट केले, 'स्वीटी, तुम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत, हे तुमच्यासाठी नवीन नाही. आता फक्त प्रतीक्षा आहे या 'लेडी सुपरस्टार'ची, जिने इतिहास घडवला होता. ब्रेक घे आणि आणखी स्ट्राँग होऊन परत ये.' आणखी एकाने लिहिले की, 'स्वीटी, चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करा, तुमच्या समर्पणाची तुलना नाही. तुम्ही ऑल-टाइम बेस्ट आहात.'
वर्कफ्रंटअनुष्का शेट्टीच्या 'घाटी' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, तो ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही आणि एका आठवड्यात फक्त ६.६४ कोटी रुपयेच कमावू शकला. कृष्णा जगर्लामुडी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अनुष्कासोबत विक्रम प्रभू आहे. अनुष्का शेट्टी आता लवकरच रॉजिन थॉमसच्या हॉरर-फँटसी थ्रिलर 'कथानार-द वाईल्ड सॉर्सरर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात ती 'नीला' नावाच्या विणकराची भूमिका साकारणार आहे.