Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णीचं राजकीय नेत्याशी झालंय लग्न?, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 18:10 IST

सोनाली कुलकर्णीने सांगितली तिच्या 'लग्नाची गोष्ट' 

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी लॉकडाउनमुळे सध्या घरात कैद आहे आणि सध्या ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील फोटो व पोस्टमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेला इंस्टाग्रामवरील एका फोटोमुळे सोनालीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. या फोटोत तिने मराठमोळा लूक केला होता आणि त्यात तिने उलटं मंगळसूत्र घातले होते. याच फोटोवरून तिच्या लग्नाची चर्चा सगळीकडे सुरू होती. याच लग्नाबाबतचा खुलासा तिने पॉडकास्टमधून केला आहे. तिने सांगितले की, माझं कोणत्याही राजकीय नेत्याशी लग्न झालेले नाही.

लग्नाच्या अफवेबद्दल सोनालीने सांगितले की, क्लासमेट चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असताना सोशल मीडियावर माझ्या लग्नाची बातमी व्हायरल झाली. कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाशी लग्न झाल्याची बातमी होती. आम्ही सगळेजण ती बातमी वाचून हसलो, कारण त्यात तथ्य काहीच नव्हते. अफवा समजून मी त्याकडे दुर्लक्षसुद्धा केले. मात्र काही दिवसांनी मला माझ्या सख्ख्या चुलत बहिणीचा फोन आला. ती माझ्या लग्नाबद्दल विचारत होती. तेव्हा मला समजले की ही अशीच पसरणारी साधी अफवा नाही.

माझा मित्र सुशांत शेलारला मी याबद्दल माहिती काढण्यास सांगितले. कारण सुशांतचे बरेच राजकीय संपर्क आहेत. त्याने थोडीफार माहिती काढली तेव्हा समजले की कोल्हापूरच्या एका विरोधी पक्षाने त्या संबंधित राजकीय नेत्याची प्रतिमा मलिन व्हावी यासाठी अशा लग्नाच्या बातम्या पसरवल्या होत्या. मात्र यात माझे नाव का गोवण्यात आले हे मला आजपर्यंत पडलेले कोडे आहे.

या सर्व अफवांचा खूप त्रास झाला पण कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे मी यातून सावरू शकले.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी