बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा सतत या-ना त्या कारणाने चर्चेत असते. गतवर्षी सोनाने मीटू मोहिमेअंतर्गत गायक व संगीतकार अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करून खळबळ माजवली होती. तिच्या या आरोपांनंतर अनु मलिकची ‘इंडियन आयडल 10’मधून हकालपट्टी झाली होती. पण नुकत्याच सुरु झालेल्या ‘इंडियन आयडल’च्या 11 व्या सीझनमध्ये अनु मलिक पुन्हा जज बनून परतला आहे. साहजिकच सोना पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाली असून तिने अनु मलिकवर निशाणा साधला आहे. केवळ अनु मलिकच नाही तर गायक सोनू निगमलाही तिने लक्ष्य केले आहे.
‘सोनू निगमने अनु मलिकला पाठींबा देण्यात कुठलीही कसर सोडली नाही. अनु मलिकला पैसे कमवण्याचा अधिकार आहे, असे काय काय अनुची पाठराखण करताना सोनू म्हणाला होता. तो माझ्या भावासारखा आहे, असेही त्याने म्हटले होते. इतकेच नाही तर माझ्या पतीला म्हणजे राम संपतला फोन करून, तुझ्या बायकोला (सोना मोहपात्रा) जरा नियंत्रणात ठेव, असे त्याने सांगितले होते. मला दहशतवादी म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. आता सोनूला आनंद झाला असेल,’ असे सोनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.