Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सावट’मधल्या भूमिकेसाठी स्मिता तांबेने घेतलीय अशी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 19:00 IST

सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता तांबे एका इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देस्मिता पहिल्यांदाच एका पोलिसाची भूमिका साकारतेय.या भूमिकेसाठी स्मिताने बरीच मेहनत घेतली आहे

सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता तांबे एका इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या वैविध्यपूर्ण सशक्त स्त्री भूमिकांनी स्मिता तांबेने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ती एका पोलिसाची भूमिका साकारतेय. या भूमिकेसाठी स्मिताने बरीच मेहनत घेतली आहे. 

स्मिता तांबे आपल्या भूमिकेविषयी सांगते, “आजवर मराठी-हिंदी सिनेमांमधून अनेक अभिनेत्रींनी पोलिसींच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे अशा भूमिका आपल्याला नवीन नाहीत. म्हणूनच आदिती देशमुखच्या भूमिकेत काहीतरी नाविन्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. भूमिकेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं. आदितीची निरीक्षणक्षमता खूप चांगली आहे. ती शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून गुन्हे सोडवणारी ऑफिसर आहे. आपल्या गतकाळातल्या अनुभवांनंतर ती थोडीशी रागीट आणि आक्रमक आहे. मग तिच्या शारीरीक अभिनयावर काम करणं जरूरीचं होतं.” स्मिता पुढे म्हणते, “तिचा बसण्या-उठण्यात, चालण्यात-बोलण्यात कसा अॅटिट्यूड असेल, यावर मी संशोधन केले. तिचे शूज कसे असतील ह्यावरही विचार केला. कामात व्यग्र असलेल्या आदितीला तयार व्हायला कमीत कमी वेळ लागेल, असेच कपडे असायला हवे होते. तसेच तिला केस विंचरायलाही जास्त वेळ लागायला नको. म्हणून हेअरकट केला. केस-स्टडी चालू असताना तिची हातावर लिहायची स्टाइल डेव्हलप केली.''

सावट सिनेमा सुपरनॅचरल थ्रिलर आहे. श्रावण महिन्यातल्या एका ठराविक रात्री एका गावात दरवर्षी एक आत्महत्या होते. सात वर्षात सात आत्महत्या झालेल्या ह्या गावात इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसर आदिती देशमुख आत्महत्यांचा तपास करायला येते. आणि मग काय घडतं ते सिनेमात पाहायला मिळतं. स्मितासह या सिनेमात  श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे  मुख्य भूमिकेत आहेत. २२ मार्च २०१९ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :स्मिता तांबे