Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…'उंबरठा' मधील स्मिता पाटील यांची मुलगी ४० वर्षानंतर दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:37 IST

या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका पूर्णिमा गणूने साकारली होती. या सिनेमामुळे ती प्रकाशझोतात आली होती.

स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांची मुख्य भूमिका असलेला 'उंबरठा' हा सिनेमा १९८२ प्रदर्शित झाला होता. स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर आशालता वाबगावकर, रवी पटवर्धन, श्रीकांत मोघे, सतीश आळेकर, दया डोंगरे यासारखे अनेक कलाकार झळकले होते. या सिनेमातील सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,चांद मातला मातला, गगन सदन ही गाणी  आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका पूर्णिमा गणूने साकारली होती. या सिनेमामुळे ती प्रकाशझोतात आली. मात्र, सध्या ती काय करते, कशी दिसते असे प्रश्न अनेकांना पडतात. 

पूर्णिमा गणू यांनी 'उंबरठा' या चित्रपटामध्ये स्मिता पाटील यांच्या लेकीची भूमिका साकारली होती. आपलं घरदार सोडून चित्रपटाची नायिका स्मिता पाटील या महिलाश्रमात जाऊन नोकरी करतात. मात्र, त्यामुळे त्या लेकीपासून आणि नवऱ्यापासून दुरावतात. यातल्या लहान मुलीची भूमिका पूर्णिमाने केली होती. पूर्णिमा गणू आजही कलाविश्वात सक्रीय आहेत. सध्या त्या मालिका आणि सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसतात. पूर्णिमा यांनी बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अनेक सिनेमा, मालिकांसाठी काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुलानेही कलाविश्वात पदार्पण केल्याचं सांगण्यात येतं.

पूर्णिमा यांचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे त्या वरचेवर त्यांचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांनी आजवरच्या कारकिर्दीत राजवाडे अँड सन्स, सुराज्य, तुझं माझं जमेना, चिंटू, पेट पुराण, तुंबाडाचे खोत , पांडू, एका काळेचे मणी, वाडा चिरेबंदी अशा नाटक, चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे. 

दरम्यान, पूर्णिमा यांच्या लेकाचं नाव ऋषी मनोहर आहे. ऋषीदेखील कलाविश्वात सक्रीय आहे. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही क्षेत्रात तो वावरताना दिसत आहे. लवकरच त्याचे अभिनित केलेले काही प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कन्नी हा त्याने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. 

टॅग्स :स्मिता पाटील