‘सिया के राम’ (Siya Ke Ram )या मालिकेत प्रभु रामाची भूमिका साकारणारा अभिनेता आशीष शर्मा (Ashish Sharma) या मालिकेनंतर तुफान लोकप्रिय झाला. सध्या हा अभिनेता कुठे आहे? तर टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आपल्या राजस्थानातील गावी. होय, अॅक्टिंग सोडून आशीषने आता शेती करायचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनदरम्यान आशीषने शेती करण्याचा निर्णय घेतला. आता मी पूर्णपणे शेतीत रमलोय, असे त्याने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कोरोना महामारी काळात मी शेतीत पेरणी केली, गाईचे दूध काढणे, ट्रॅक्टर चालवणेही शिकलो, असे तो म्हणाला.
आयुष्यातला खरा आनंद आपण विसरत चाललो आहोत. पण या महामारीने आपल्याला खूप काही शिकवले. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देतात, असे तो म्हणाला.
मी पुन्हा शेतकरी बनण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आल्यानंतर मी शेतीकडे दुर्लक्ष केले होते. पण आता मी पुन्हा माझ्या गावाला परतलो आहे, असे त्याने सांगितले. गावात आमची 40 एकर जमीन आहे. 40 गाई आहेत. पौष्टिक आहार पद्धतीला प्रोत्साहन देणे आमचे ध्येय आहे. मी आता याच दिशेने काम करू इच्छितो, असेही त्याने स्पष्ट केले. सिया के राम या मालिकेत आशीषने रामाची भूमिका साकारली होती. रंगरसिया या मालिकेतही तो झळकला होता.