Sitaare Zameen Par: बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते रिलीज डेटची वाट पाहत आहे. आता याबद्दल आमिर खान यानं अपडेट दिलं आहे. आमिर खानने काल प्रजासत्ताक दिन साजरा करताना चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेचे संकेत दिले.
रविवारी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आमिर खान उपस्थित होता. यावेळी आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, "ही एक मनोरंजक कथा आहे, मला चित्रपट खूप आवडला". तसेच 'सितार जमीन पर' चित्रपटाच्या क्लायमॅक्सचं गुजरातमधील वडोदरा येथे शुटिंग झाल्याचं सांगितलं. आमिर खान यानं बोलताना हा सिनेमा २०२५ मध्येच प्रदर्शित होणार असल्याचे संकेत दिले. यामुळे चाहत्यांच्या आनंद द्विगुणीत झाला आहे.
'सितार जमीन पर' हा चित्रपट आधीचा 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. १६ वर्षांनंतर आमिर खान आणि अभिनेता दर्शील सफारी एकत्र पाहायला मिळणार आहेत. दर्शिलने 'तारे जमीन पर'मध्ये देखील मुख्य भूमिका साकारली होती. खास करून या चित्रपटात महाराष्ट्राची लाडकी सून बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) दिसणार आहे.
'सितार जमीन पर' ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट शुभ मंगल सावधान फेम आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला आहे. 'सितार जमीन पर'व्यतिरिक्त, आमिर खान हा अभिनेता सनी देओलच्या 'लाहोर १९४७' मध्ये देखील पाहायला मिळणार आहे.