सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा अॅक्शन चित्रपट आज १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते देशभरातच नव्हे तर परदेशातही पसरलेले आहेत. त्यांच्या चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह हा नेहमीच पाहण्यासारखा असतो. जेव्हा त्यांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा चाहत्यांकडून भव्य स्वागत, मोठ्या प्रमाणात पोस्टरवर दूधाचा अभिषेक आणि विविध धार्मिक विधी केले जातात. काही चाहते तर त्यांना देवतासमान मानतात. त्यांच्या नावाने आणि प्रतिमेसमोर नियमित पूजा-अर्चा करतात. इतकंच नाही आता 'कुली' चित्रपट पाहण्यासाठी काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी दिली आहे. तसेच तिकिटांची जबाबदारीही स्वतः घेतली आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सिंगापूरस्थित फार्मर कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या तमिळ कर्मचाऱ्यांना सुट्टीसह मोफत तिकिटे आणि ३० सिंगापूर डॉलर्स खर्चासाठी दिले आहेत. तर एसबी मार्ट प्रायव्हेट लिमिटेडने देखील १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० ते ११ वाजेपर्यंत स्टोअर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून कर्मचारी चित्रपट पाहू शकतील. याशिवाय, भारतात, मदुराईस्थित युनो अॅक्वा केअरने कर्मचाऱ्यांना सुट्टी देत मोफत तिकिटे बुक केली आहेत. त्याचबरोबर, वृद्धाश्रम व अनाथाश्रमासाठी अन्नदानाचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. चेन्नईतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याच्या बॉसने केवळ रजा मंजूर केली नाही तर संपूर्ण टीमसोबत चित्रपट पाहण्याची योजनाही आखली आहे.
अनेक कंपन्या या चित्रपटाच्या उत्साहाचा ब्रँडिंगसाठी उपयोग करत आहेत. वसंत अँड कंपनीने सोशल मीडियावर स्पर्धा आयोजित केली आहे, ज्यात रजनीकांतशी संबंधित प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्यांना मोफत 'कुली' तिकिटे मिळणार आहेत. 'कुली' हा २०२५ मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एका मोठ्या उत्सवासारखा आहे. दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या या चित्रपटात रजनीकांतसोबत नागार्जुन, सत्यराज, सौबिन शाहीर, उपेंद्र, श्रुती हासन आणि आमिर खानसारखे कलाकार आहेत.