Join us

श्रेयस तळपदे म्हणतोय, 'माय नेम इज लखन', जाणून घ्या या मागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 19:30 IST

सोनी सब वाहिनीवर लवकरच 'माय नेम इज लखन' ही नवीन मालिका दाखल होते आहे.

ठळक मुद्दे श्रेयस तळपदे लखनच्या भूमिकेत 'माय नेम इज लखन'ची कथा लखन नामक मोठ्या डॉनवर आधारीत

सोनी सब वाहिनीवर लवकरच नवीन मालिका दाखल होते आहे. या मालिकेचे नाव 'माय नेम इज लखन' असे असून या मालिकेत श्रेयस तळपदे लखनच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेबाबत श्रेयस खूपच उत्सुक आहे.

'माय नेम इज लखन' या मालिकेची कथा लखन नामक मोठ्या डॉनभोवती फिरते. त्याच्या आयुष्यात अचानकपणे घडलेल्या एका प्रसंगामुळे विलक्षण बदल घडतात आणि त्याच्या बदलाच्या प्रवासात त्याला कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या भूमिकेबद्दल श्रेयस म्हणाला की, 'लखन ही माझी भूमिका मुख्य पात्र आहे आणि आपले जीवन कसे जगावं याबद्दल स्वतःच्या वडिलांबरोबर त्याचे मुलभूत मतभेद आहेत. आताच्या जगात शक्तिशाली माणूसच तग धरून राहू शकतो असे त्याला वाटत असते. त्यामुळे या जगात जर तुम्हांला स्वतःचा टिकाव धरून ठेवायचा असेल तर तुम्ही सामर्थ्यशालीच बनायला हवे. मग त्यासाठी तुम्ही कोणताही मार्ग, त्या वेळेला योग्य वाटेल अशी कोणतीही पद्धत अवलंबली तरी हरकत नाही. पण शाळेत शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांच्या मूल्य आणि नियमांच्या चौकटीत या गोष्टी बसत नसतात. आपल्या मुलाने आपल्यासारखेच सदाचारी आचरण ठेवावे अशी त्यांची अपेक्षा असते आणि हेच त्यांच्यामधल्या संघर्षाचे मुख्य कारण असते.'

'माय नेम इज लखन' मालिकेच्या चित्रीकरणाला अद्याप सुरूवात झालेली नाही. आता फक्त प्रोमे व फोटोशूट पार पडले आहे. साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शूटिंगला सुरूवात होईल, असा अंदाज श्रेयसने वर्तवला आहे. श्रेयला लखनच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :श्रेयस तळपदेसोनी सब