सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. रेश्मा शिंदे, ऋतुजा लिमये, हेमल इंगळे यांच्यानंतर आता 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनार लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानी अभिनेता अंबर गणपुळेसह सात फेरे घेणार आहे. त्यांची लगीनघाई सुरू असून नुकताच त्यांचा संगीत सोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
शिवानी आणि अंबरने संगीत सोहळ्यात त्यांच्या डान्सने सगळ्यांनाच थक्क केलं. लोकप्रिय साऊथ गाण्यावर ते दोघेही थिरकले. यावेळी त्यांचा उत्साह आणि एनर्जी पाहण्यासारखी होती. 'ranu ranu antune chinnado' या गाण्याच्या हुकस्टेप करत शिवानी आणि अंबरने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. त्या दोघांच्या डान्सने खरं तर संगीत सोहळा गाजवला. संगीत सोहळ्यासाठी शिवानीने डिझायनर लेहेंगा घातला होता. तर अंबरने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
शिवानी आणि अंबरने गेल्या वर्षी साखरपुडा करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर आता ते लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. संगीत सोहळ्याआधी त्यांचा मेहेंदी सोहळा पार पडला. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.