अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीतही काम केलंय. अमृताने हिंदी रिएलिटी शोज आणि सिनेमात काम केले आहे. अमृताने नुकतेच लोकमत सखीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगितले.
अमृता खानविलकर म्हणाली की, ''जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या घरात फार पैसे नव्हते. पैसे नसल्यामुळे जे काही अडचणी यायच्या. मी फक्त एवढंच बघितलंय की आज आमच्याकडे दुधासाठी पैसे नाहीयेत. आज आमच्याकडे काही कपडे घ्यायला पैसे नाहीयेत. आज आमच्याकडे दिवाळीसाठी पैसे नाहीयेत. तर मला असं झालेलं की मला काम करून पैसे कमवायचेत. मी सुरुवातीला जे काम मिळेल ते केलंय. मी अँकरिंग केलंय. डान्स केला. मी गाणी केलीयेत. मी चित्रपट केलेत. मी हिंदीमध्ये काम केलंय. मी टेलिव्हिजनमध्ये काम केलंय. म्हणजे तू म्हणशील त्या-त्या ठिकाणी मी काम काम केलंय.''
ती पुढे म्हणाली की, ''मला आठवतं की मी एका मोठ्या चॅनेलवरती एक अँकरिंग शो करत होते तर तेव्हा ना मी ३०-३० टेक घ्यायचे आणि लोक मला तिकडे व्हर्नाक्युलर म्हणायचे. काय कशी आहे ही हिला हिला शब्दाचं उच्चार नीट येत नाहीये आणि उभं राहायची पद्धत नाहीये. कळत नाहीये तिला. कोणीतरी हेअर केले तर कोणीतरी कॉश्च्युम दिला. तेव्हा कुठे अक्कल असायची कशावर काय चांगलं दिसतंय कसा मेकअप होतोय कोणीतरी लाल लिपस्टिक दिली तर ती लाल लिपस्टिक लावायची खूप हेवी आइज केले तर ते ओके. मग माझं असं व्हायचं ओके सगळं ओके आहे. मला कुठे काय माहिती होतं आणि त्या-त्या गोष्टींमधून निघून निघून निघून मग मी २००६ साली माझा पहिला मराठी चित्रपट केला. मग तिकडून मागे वळू शकत नव्हते. मला वाटतं खूप खूप स्ट्रगल असा नाही पण या क्षेत्राने खूप शिकवलंय. ''