बॉलिवूड अभिनेता संजय दत्त १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी तुरुंगात होता. पाच वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त बाहेर आला होता. संजय दत्तला बाहेर काढण्यासाठी वडील सुनील दत्त यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. संजूबाबाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील प्रयत्न केल्याचे अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. त्याबरोबरच संजूबाबाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी धक्कादायक खुलासादेखील केला आहे.
मी त्याला जेलमधून बाहेर काढलं पण आता तो मला विसरला, असं शत्रुघ्न सिन्हा ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?
तेव्हा आम्हाला त्याचं खरंच खूप टेन्शन होतं. त्याला सपोर्ट कसा करायचा आणि जेलमधून बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न करायचे याचाच विचार आम्ही करायचो. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आमची मदत केली. त्यांनी संजय दत्तसोबत आमची भेट घडवून दिली. त्याला जेलमधून बाहेर काढण्यात बाळासाहेब ठाकरेंचं मोठं योगदान आहे.
आता तो मला भेटतही नाही!
मला आठवतंय जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय दत्त पहिल्यांदा माझ्या घरी आला होता. त्यानंतर आम्ही सगळे राजन लालच्या घरी जमलो होतो आणि संजूबाबाला आशीर्वाद दिले होते. पण, त्यानंतर आम्ही त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो आम्हाला भेटला नाही. पण, याचा अर्थ तो चांगला व्यक्ती नाही असं नाही. काही कारणं असू शकतात. किंवा तो खरंच व्यस्त असेल.