Join us

Video - "३३ कोटी देव म्हणजे नेमकं काय?, किती हिंदूना हे माहीत आहे?"; शरद पोंक्षेंनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:17 IST

Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांनी एक व्हि़डीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी ३३ कोटी देवांबाबत भाष्य केलं आहे.

अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील ते आपली मतं सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टची तुफान चर्चा रंगते. याच दरम्यान आता शरद पोंक्षे यांनी एक व्हि़डीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी ३३ कोटी देवांबाबत भाष्य केलं आहे. ३३ कोटी देव म्हणजे नेमकं काय? य़ा प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

"३३ कोटी देव यामधलं जे कोटी आहे ते सांकेतिक किंवा गणितामधलं कोटी नाही. दहा, शंभर, हजार, लाख, कोटी यामधलं ते कोटी नव्हे. ३३ कोटी देव म्हणजे ३३ प्रकारचे देव. येथे कोटीचा अर्थ प्रकार आहे. किती हिंदूना हे माहीत आहे?" असं शरद पोंक्षे यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विविध विषयांवर भाष्य करत असतात. 

३३ कोटी देव खरंच असतात का? ‘ही’ आहेत नावे

३३ कोटी देवता ही संकल्पना आहे. ३३ कोटी ही संख्या नाही. कोटी हा शब्द या ठिकाणी प्रकार या अर्थाने घेण्यात आलेला आहे. संस्कृत भाषेत 'कोटी' या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. त्यामुळे आपल्याकडे ३३ कोटी ही देवतांची संख्या नसून, त्याचे प्रकार आहेत, असे सांगितले जाते. या ३३ कोटी देवतांचा उल्लेख काही प्राचीन ग्रथांमध्ये आढळून येतो. महाभारतात आणि हरिवंश यांसारख्या प्राचीन ग्रंथात या ३३ कोटी देवतांसंदर्भातील काही उल्लेख आल्याचे पाहायला मिळते. 

३३ कोटी देवतांची नावे काय? 

३३ कोटी देवतांकडे या संपूर्ण सृष्टिचे व्यवस्थापन असल्याची मान्यता आहे. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती आहेत. या प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहे. प्रत्येकाचा कार्यभार वेगळा असल्यामुळे याला कोटी म्हटले गेले आहे, असे सांगितले जाते. कोटी हा शब्द विशेषणात्मक आहे संख्यावाचक नव्हे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शरद पोंक्षेहिंदू