Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखला करायचं नव्हतं गौरीसोबत लग्न? प्रसिद्ध निर्मात्याच्या सल्ल्यामुळे डगमगली होती किंग खानची पावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 14:14 IST

Shahrukh khan: गौरीसोबत लग्न करता यावं यासाठी शाहरुखने खूप प्रयत्न केले होते. पण, एका सल्ल्यामुळे तो प्रश्नात पडला होता.

बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणून कायम अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांच्याकडे पाहिलं जातं. गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखने किती कष्ट उपसलेत हे त्याच्या चाहत्यांना चांगलंच माहित आहे. परंतु, एक काळ असा आला होता ज्यावेळी एका प्रसिद्ध निर्मात्याने शाहरुखला गौरीसोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे या सल्ल्यामुळे काही काळ शाहरुख सुद्धा गोंधळून गेला होता.

१९९४ मध्ये गौरी आणि शाहरुखने लग्नगाठ बांधली.या लग्नानंतर गौरीने एका फिल्मफेअरला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने शाहरुखसोबतच्या नात्याविषयी अनेक खुलासे केले. ज्यावेळी शाहरुखने गौरीसोबत लग्न केलं त्यावेळी तो इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होता. त्यामुळे त्याला अनेकांनी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नाही तर जुही चावलामुळे त्याने एका प्रकाशनाच्या कार्यालयात जाऊन मोठा दंगाही केला होता.

गौरी आणि शाहरुख एकमेकांना डेट करत असतानाच शाहरुखचं नाव जुही चावलासोबत जोडलं जात होतं. 'डर' सिनेमात या जोडीने एकत्र काम केल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकंच नाही तर एका मासिकात त्यांच्याविषयी बरंच काही लिहिण्यात आलं होतं. ज्यामुळे शाहरुखने या प्रकाशनाच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली होती, असं गौरीने सांगितलं तसंच माझ्यासोबत त्याने लग्न करु नये, असा सल्लाही त्याला मिळाल्याचं तिने म्हटलं होतं. 

शाहरुखनेही एका मुलाखतीमध्ये त्याला गौरीसोबत लग्न न करण्याचा सल्ला मिळाल्याचं म्हटलं होतं. "गौरीसोबत लग्न करता यावं यासाठी मी फार कष्ट उपसले आहेत. मी कायम तिला, चल लग्न करुयात, असं म्हणायचो आणि ती नकार द्यायची. ती त्यावेळी फार निर्दयी होती. एक वर्षानंतर माझ्या आईचा मृत्यु झाला. त्यामुळे गौरीला फार वाईट वाटलं आणि, चल, लग्न करु असं ती स्वत:हून म्हणाली. मी अभिनेता होऊ नये असं तिला वाटत होतं. पण, ती समोरुन लग्नाचा विषय काढतीये म्हटल्यावर मी पण लगेच लग्न करायला तयार झालो. मात्र, एका प्रसिद्ध निर्मात्याने मला हे लग्न न करण्याचा सल्ला दिला. बॅचलर हिरोचे फॅन फॉलोअर्स जास्त असतात. त्यामुळे मी लग्न करु नये असं त्यांचं मत होतं. त्यामुळे मी प्रश्नात पडलो," असं शाहरुख म्हणाला.

दरम्यान, "मोठ्या मुश्किलीने पटवलंय, लग्न तर करावंच लागेल", असं उत्तर शाहरुखने या निर्मात्यांना दिलं आणि गौरीसोबत लग्न केलं. गौरी आणि शाहरुख यांना बॉलिवूडचं पॉवरफूल कपल म्हणून ओळखलं जातं. नुकतीच शाहरुखच्या लेकीने सुहानाने सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

टॅग्स :शाहरुख खानगौरी खानबॉलिवूडसेलिब्रिटीसुहाना खान