बॉलिवूडचा 'किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान कायमच बॉलिवूडमध्ये त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. शाहरुखच्या चढत्या-उतरत्या करिअरमध्ये त्याची पत्नी गौरी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने साथ दिली आहेच. पण शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा (Pooja Dadlani) सुद्धा शाहरुखच्या सध्याच्या यशस्वी करिअरमध्ये महत्वाचा वाटा आहे. पूजा ही एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओपेक्षा जास्त कमाई करते. जाणून घ्या याविषयी
शाहरुखची मॅनेजर पूजाची कमाई किती?
गेल्या अनेक वर्षांपासून पूजा शाहरुखच्या प्रत्येक कामाची देखभाल करतेय. ज्यामध्ये शाहरुखच्या चित्रपटांचे व्यवहार, जाहिरातींचे करार आणि शाहरुखच्या इतर व्यावसायिक प्रोजेक्टसंबंधाची बोलणी पूजाकडून केली जाते. पूजाची एकूण संपत्ती अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे, असं म्हटलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा ददलानीची वार्षिक कमाई सुमारे ७ ते ९ कोटी रुपये आहे. तर तिची एकूण संपत्ती ४५ ते ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर शाहरुखची विश्वासू सहकारी म्हणून पूजाला ओळखलं जातं.
पूजा ददलानी २०१२ पासून शाहरुखसोबत काम करत आहे. ती फक्त मॅनेजर नसून, शाहरुखच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. ती शाहरुखच्या प्रॉडक्शन हाऊस 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' आणि आयपीएल टीम 'कोलकाता नाइट रायडर्स'च्या व्यवस्थापनाची कामंही सांभाळते. आर्यन खानला अटक झाली तेव्हा पूजा ही खान कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. असं सांगण्यात येतं की, जेव्हा आर्यनला जामीन नाकारला गेला तेव्हा पूजा कोर्टाच्या बाहेर रडली होती. त्यामुळेच शाहरुख आणि त्याच्या परिवाराचा पूजा ददलानी हा एक अविभाज्य भाग आहे.
पूजा ददलानी मुंबईच्या वांद्रे येथील एका आलिशान घरात राहते. तिच्या घराचे इंटीरियर डिझाइन स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खानने केले आहे. तिचे पती हितेश गुरनानी हे ज्वेलरी ब्रँड 'लिस्टा'चे संचालक आहेत. सोशल मीडियावर ती अनेकदा शाहरुख आणि त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करते. पूजा आता आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये अभिनय करताना दिसणार आहे.