Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीना गुप्तांच्या ‘त्या’ खुलाशानंतर सतीश कौशिक यांनी तोडली चुप्पी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 18:07 IST

प्रेग्नन्ट नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी केलं होतं लग्नासाठी प्रपोज; आता समोर आलं कारण

ठळक मुद्दे नीना आजही आमच्या घरी येते. आजही तिच्याबद्दल माझ्या मनात तेवढाच आदर आहे, असं ते म्हणाले.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या  त्यांच्या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ (Sach Kahun Toh) प्रकाशित झालं.  या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधीत अनेक खुलासे केले आहेत. अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्याबद्दलही नीनांनी एक मोठा खुलासा केला आहे. ‘मी  विवियन रिचर्ड्स यांच्या बाळाला जन्म देणार होती, कुमारी माता बनणार होती तेव्हा अभिनेता सतीश कौशिक यांनी मला लग्नाचा प्रस्ताव दिला होता.  जर हे बाळ डार्क स्कीन घेऊन जन्माला आलं तर तू हे सतीश कौशिकचं बाळ आहे असं सर्वांना सांगू शकतेस, असे सतीश कौशिक म्हणाल्याचा खुलासा नीनांनी केला होता. आता नीनांच्या या खुलाशानंतर सतीश कौशिक यांची प्रतिक्रिया आली आहे.

मी नीनाला ती प्रेग्नंट असताना लग्नाचा प्रस्ताव दिला होता, हे खरं आहे. मी हे सगळं एक सच्चा मित्र या नात्यानं केलं होतं, असं सतीश कौशिक म्हणाले.एका मुलाखतीत सतीश कौशिक नीनांच्या खुलाशावर बोलले. ते म्हणाले, ‘ नीना व मी चांगले मित्र होतो आणि आहोत. 1975 सालापासून आम्ही एकमेकांना ओळखतो.  एक खरा मित्र या नात्यानं मी तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. तिनं स्वत:ला एकटी समजू नये, असा माझा प्रयत्न होता. एक मुलगी लग्नाआधी आई होतेय. तिच्या त्या निर्णयाचा मला आदर होता. पाठींबा होता. मी मित्र म्हणून खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होतो. तिला हिंमत देत होतो. मी आहे, मग चिंता का करतेय, असे मी तिला म्हणालो होतो. त्यानंतर नीनाच्या डोळ्यांत अश्रू होते. त्या दिवसानंतर आमची मैत्री आणखी घट्ट झाली होती. मला आनंद आहे की, नीना आज तिच्या करिअरमध्ये उत्तम काम करतेय. एका चांगल्या व्यक्तिसोबत संसार करतेय, याचाही आनंद आहे.

नीना गुप्ता त्यांच्या पुस्तकात तुमच्या या प्रपोजलबद्दल लिहिणार असल्याचे तुम्हाला ठाऊक होते का? असं विचारलं असता, हो तिनं मला विचारलं होतं. यावर तू तुला वाटतं ते मनमोकळेपणानं लिही. मला काहीही अडचण नाही, असं मी तिला म्हणालो होतो. माझी पत्नी शशी आमच्या मैत्रीबद्दल जाणून आहे. नीना आजही आमच्या घरी येते. आजही तिच्याबद्दल माझ्या मनात तेवढाच आदर आहे, असं ते म्हणाले. 

टॅग्स :नीना गुप्ता