Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 20:40 IST

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटात खूप सारे मनोरंजक किस्से आणि धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

ठळक मुद्दे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपट १ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

‘समीर’...एकुलता एक मुलगा, तो ही मनाने आणि राहणीमानाने एकदम साधा पण त्याचे लव्ह मॅरीज होणार असे गडबडे बाबांनी केलेले भाकीत. एक से बढकर एक, नटखट, प्रेमळ, ग्लॅमरस तरुणी आणि जिगरी दोस्त ‘बाब्या’चे लव्ह टीप्स... या सर्व गोष्टींमुळे एण्टरटेन्मेंट पॅकेज असलेल्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटात खूप सारे मनोरंजक किस्से आणि धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मी़डियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमधून प्रेक्षकांना याचा अंदाज आलाच असेल की मैत्री, फ्लर्टिंग, प्रेम, लग्न हे जर आयुष्यात असेल तर आयुष्य एक रोलर कोस्टर राईड होऊन जाते. 

या चित्रपटात सिद्धार्थ जाधवने बाब्याची आणि सौरभ गोखलेने समीरची भूमिका साकारली आहे. समीरच्या आयुष्यात येणाऱ्या मुलींची भूमिका संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल या अभिनेत्रींनी साकारली आहे. ट्रेलर तर अफलातून आणि मनोरंजक तर आहेच पण गडबडे बाबा या व्यक्तीने धमाल डायलॉगबाजी करुन प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता नक्कीच वाढवली असणार. सर्वांचे लाडके महेश मांजरेकर यांनी साकारलेले गडबडे बाबा पात्रे लोकप्रिय होणार यात शंका नाही.तसेच  कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर,हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांनी देखील ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ची रंगत वाढवली आहे.  आयुष्यात प्रेम नाही ना केले तर ते आयुष्य व्यर्थ आहे असे सांगणारा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपट १ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :सौरभ गोखलेसिद्धार्थ जाधव