Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारेगमपचा स्पर्धक जयेश खरेनं गायलं 'नाळ भाग २'चं 'डराव डराव' गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:07 IST

यापूर्वी 'नाळ' या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. आता 'नाळ भाग २' मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत.

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित "नाळ भाग २' मधील 'डराव डराव' गाणे ऐकले का? अर्थात हे बच्चे कंपनीवर चित्रित करण्यात आलेले गाणे मोठ्यांनाही आवडेल असे आहे. चैतू, चिमू आणि मणी यांची धमाल असलेल्या या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी संगीत दिले आहे. तर या जबरदस्त गाण्याला जयेश खरे आणि मास्टर अवन यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी 'नाळ' या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. आता 'नाळ भाग २' मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत.

 या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला लाभलेला नवोदित गायकाचा आवाज. मुळात नागराज मंजुळे हे आपल्या चित्रपटांमध्ये नेहमीच नवोदितांना संधी देतात आणि हे कलाकार या संधीचे सोने करतात. असाच हिरा ए. व्ही प्रफुल्लाचंद्रा, नागराज मंजुळे आणि सुधाकर यंकट्टी यांना जयेश खरेच्या रूपात सापडला आणि झी स्टुडिओजने त्याला संधी दिली. सारेगमपमध्ये जयेश स्पर्धक आहे आणि तिथेच या सर्वांनी त्याला हेरले. खरं तर जयेश खरेने अल्पावधीतच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गाण्यात विशेष लक्ष वेधून घेत आहे ती चिमुकली चिमू. एवढीशी गोड मुलगी तिच्या भावंडांसोबत धमाल करत आहेत. तिच्यातील हा गोडवा, निरागसता भावणारी आहे.

 ‘आई मला खेलायला जायचंय’ सारखेच हे गाणेही आपल्याला बालपणात रमवेल. आता या गाण्यामुळे ‘नाळ भाग २’ बघण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. याबद्दल नागराज मंजुळे म्हणाले, '' आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्यात कला दडलेली असते. बऱ्याचदा ती आपल्या नजरेत येत नाही. त्यामुळे मी अशा कलाकारांना नेहमीच संधी देतो. त्यांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे आजवर माझी ही निवड नेहमीच योग्य ठरली आहे. अर्थात हे त्या कलाकारांचे यश. जयेश खरे त्यातलाच एक कलाकार. जयेशच्या आवाजात जादू आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याच्या या जादुई आवाजाने या गाण्यातूनही भावना व्यक्त होत आहेत.'' झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :नागराज मंजुळे