Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prashant Damle : माझा तुझ्यावर विश्वास नाही असं समज..., संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची प्रशांत दामलेंसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 13:09 IST

Prashant Damle : ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी ६ नोव्हेंबर त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. हेच औचित्य साधून  मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी ६ नोव्हेंबर त्यांच्या कारकीर्दीमधला  १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. यामुळे सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. हेच औचित्य साधून  मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा (Sankarshan Karhade) भाऊ अधोक्षज ( adhokshaj ) कऱ्हाडे याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. अधोक्षजने  प्रशांत दामले यांच्याबरोबर ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकात काम केलं आहे. सध्या अधोक्षजची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

वाचा, अधोक्षजची पोस्ट त्याच्याच शब्दांत...

२ ऑगस्ट २०२२. सकाळी पावणेनऊची गोष्ट. माझ्या रूटीन प्रमाणे मी सकाळी नुकताच जिमहून घरी आलो होतो. मोबाईलचं इंटरनेट ऑन केलं आणि पहिला मेसेज फ्लॅश झाला तो दामले सरांचा. मी मेसेज उघडण्या आधीच संकर्षणला विचारलं, "तू दामले सरांचा कॉल उचलला नाहीस का, त्यांना रिप्लाय दिला नाहीस का?" सहसा, संकर्षण कडून जर कधी दामले सरांचा कॉल मिस् झाला तर ते लगेच मला कॉल किंवा मेसेज करून "अधो, संक्या कुठेय?" असं विचारतात!पण मी मला आलेला तो मेसेज उघडला, तर दामले सरांनी लिहिलं होतं, "अधो,*रविवार 6 नोव्हेंबर माझ्यासाठी राखून ठेव*आत्ताच डायरी मधे लिहून ठेव.आणि लिहिलंस की मला सांग.माझा तुझ्यावर विश्वास नाही असं समज "मला प्रश्न पडला. "सरांनी असा मेसेज का केला असेल? तो ही चक्क ३ महिने आधी? काय असेल?" सगळे तर्क वितर्क माझ्या डोक्यात चालू झाले. बरं, त्यांना मेसेज करून "काय आहे त्यादिवशी सर?" असं विचारायचं धाडस होईना. मी लगेचच माझ्या डायरीमध्ये ६ नोव्हेंबरच्या पानावर " Reserved for Damle Sir" अशी नोंद केली आणि सरांना फोटो काढून पाठवला!पुढे काही दिवसांनी सरांची भेट झाल्यावर त्यांना विचारलं तेव्हा सर म्हणाले, "माझा १२५०० वा प्रयोग आहे, त्याला तुला यायचं आहे!"मला प्रचंड आनंद झाला! एक प्रेक्षक म्हणून पण आणि एक सहकलाकार म्हणून सुद्धा! खरतर मी दामले सरांसोबत 'साखर खाल्लेला माणूस' ह्या एकाच नाटकाचे फक्त ७२ प्रयोग केले, ते ही रीप्लेसमेंट आर्टिस्ट म्हणून. ते १२५०० प्रयोगांच्या १% सुद्धा नाहीत! पण तरीही त्यांनी मला लक्षात ठेवलं, आवर्जून ह्या विश्वविक्रमी प्रयोगाला बोलावलं, याचं मला खूप आश्चर्य, आनंद, कौतुक, आदर आणि संकोच वाटला.ह्या ७२ प्रयोगात मी दामले सरांकडून खूप गोष्टी शिकलो. अजूनही शिकतोय. संवाद म्हणताना कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा, लाफ्टर कसे काढायचे, स्टेजवर आणि बॅकस्टेजला कसं अलर्ट राहायचं, लिस्निंग कसं वाढवायचं, आणखीही बरंच काही...!'साखर' च्या निमित्तानं मला दामले सरांच्या रुपात गुरू तर मिळालेच, पण त्याचबरोबर कधीकधी हक्काने रागावणारा, समजून सांगणारा, समजून घेणारा, सल्ले देणारा आणि कधीकधी माझ्याकडून टेक्नॉलॉजीकल सल्ले घेणारा वडीलधारा मित्रही मिळाला! त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं अजून खूssप आहे, पण ते पुन्हा केव्हातरी.एवढंच सांगतो, व्यावसायिक रंगभूमीवर या माणसानं मला उभं केलं!सर, उद्या तुम्ही नवीन विश्वविक्रम करताय. पुढेही अनेक होत राहतील. मला तुमच्यासारखं होता येणं अशक्य आहे. निदान त्या दिशेनं प्रवास करण्याची प्रेरणा मिळावी, एवढाच आशीर्वाद असू द्या.... 

टॅग्स :प्रशांत दामलेसेलिब्रिटीमराठी अभिनेता