Join us
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या आठवणीत संजूबाबा पुन्हा भावुक; महिन्याभरात केल्या ३ पोस्ट, म्हणाला- "तू माझ्याबरोबर असतीस तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 17:18 IST

मदर्स डे आणि नर्गिस दत्त यांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने भावुक पोस्ट लिहिली होती. आता पुन्हा संजय दत्तला आईची आठवण येत आहे.

संजय हा दत्त हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यानेही अभिनयात करिअर करायचं ठरवलं. संजय दत्त हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा. नर्गिस दत्त यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. अभिनयाबरोबरच चर्चा व्हायची ती त्यांच्या सौंदर्याची. भल्याभल्यांना भुलवेल असं त्यांचं सौंदर्य होतं. अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आणि सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर १९८१ साली नर्गिस यांनी या जगाचा निरोप घेतला. 

आईच्या निधनानंतर संजय दत्त नैराश्यात गेला होता. आतादेखील अनेकदा तो आईच्या आठवणीत भावुक झालेला दिसतो. गेल्या काही दिवसांत आईच्या आठवणीत संजय दत्तने पोस्ट शेअर केल्या होत्या. मदर्स डे आणि नर्गिस दत्त यांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने भावुक पोस्ट लिहिली होती. आता पुन्हा संजय दत्तला आईची आठवण येत आहे. त्याने नर्गिस यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 

नर्गिस दत्त यांचा जन्म १ जून १९२९ रोजी झाली होता. आज त्यांचा जन्मदिवस आहे. आईच्या वाढदिवशी संजय दत्तने त्यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला त्याने कॅप्शनही दिलं आहे. "हॅपी बर्थडे आई...मला तुझी प्रत्येक दिवशी, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला आठवण येते. तू माझ्याबरोबर असतीस तर तुला मी जसं आयुष्य जगायला हवं होतं, तसं करता आलं असतं. तुला माझा अभिमान वाटत असेल, अशी आशा आहे. लव्ह यू आणि मिस यू", असं संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

नर्गिस यांनी ३ मे १९८१ साली या जगाचा निरोप घेतला. त्यांना कॅन्सर झाला होता. सुनील दत्त यांच्याशी लग्न करण्याआधी नर्गिस यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. १९५८ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त ही तीन मुले आहेत.  

टॅग्स :संजय दत्तसेलिब्रिटीनर्गिस