Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापरे..!, 'शोले'तल्या 'या' गाजलेल्या डायलॉगसाठी सांभानं तब्बल २७ वेळा केला मुंबई ते बंगळुरू प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 07:00 IST

'शोले'तील सांभाच्या भूमिकेतून अभिनेते मॅक मोहन यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते.

७०च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले'तील सांभाच्या भूमिकेतून अभिनेते मॅक मोहन यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. या भूमिकेनंतर ते सांभाच्या नावाने लोकप्रिय झाले होते. मॅक यांनी चित्रपटात कधीच लीड रोल केला नाही पण ते बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. मॅक मोहन हे नात्याने रवीना टंडनचे मामा आहेत.

मॅक मोहन यांनी बॉलिवूडमधील जवळपास सर्व मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. जवळपास तीन तासाच्या शोले चित्रपटात सांभाला फक्त एकच डायलॉग होता आणि हा डायलॉग होता पूरे पचास हजार. या एका डायलॉगने त्यांना जगभरात लोकप्रियता मिळाली होती. या एका डायलॉगच्या शूटिंगसाठी मॅक मोहन यांना मुंबई ते बंगळुरू असा तब्बल २७ वेळा प्रवास करावा लागला होता. सुरूवातीला चित्रपटात त्यांची भूमिका मोठी होती. मात्र चित्रपटाचे एडिटिंग झाल्यानंतर त्यांचा फक्त एकच डायलॉग होता.

मॅक मोहन शोलेचे एडिटिंग झाल्यानंतर चित्रपट पाहून खूप नाराज झाले होते. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले होते की, जेव्हा मी सिनेमा पाहिला तेव्हा मी रडू लागलो होते. मी थेट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की माझी एवढी छोटीच भूमिका का ठेवली? तुम्हाला हवे होते तर हटवून टाकायचे. तेव्हा ते म्हणाले की, जर चित्रपट हिट झाला तर जग तुला सांभाच्या नावाने ओळखेल आणि तसेच घडले.

१९६४ साली मॅक मोहन यांनी हकीकतमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ४६ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास १७५ चित्रपटात काम केले होते.  ते अतिथी तुम कब जाओगेचे शूटिंग करत होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या फुफ्फुसात ट्युमर आहे. त्यानंतर त्यांच्यावर खूप काळ उपचार केले. पण १० मे, २०१० रोजी त्यांचे निधन झाले.मॅक मोहन यांनी शार्गिद, अभिनेत्री, जंजीर, हीरा पन्ना, हंसते जख्म, मजबूर, प्रेम कहानी, हेरा फेरी, डॉन, चरस, काला पत्थर, जानी दुश्मन, कर्ज, कुर्बानी, शआम, दोस्ताना, कालिया, सत्ते पे सत्ता, लाल बादशाह, आग ही आग, इंसान यांसारख्या चित्रपटात काम केले होते.

टॅग्स :मॅक मोहन