अभिनेता सलमान खान (Salman Khan) मध्यंतरी चर्चेत होता. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या धमक्यांमुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गेल्या वर्षी सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर पहाटे गोळीबारही झाला होता. यामुळे सलमानचा जीव धोक्यात होता. त्याचे वडील सलीम खान यांनाही मॉर्निंग वॉकवेळी एक माणूस जवळ येऊन चिठ्ठी देऊन गेला. सलमानला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली. त्याने स्वत:साठी बुलेटप्रुफ गाडीही घेतली. इतकंच नाही तर त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटवरील बाल्कनीतही बुलेटप्रूफ सेफगार्ड लावण्यात आलं. मात्र हे धमक्यांमुळे लावण्यात आलेलं नसल्याचा खुलासा सलमानने केला आहे. मग का लावलं सेफगार्ड?
सलमान खानच्या गॅलर्सी अपार्टमेंटमधील बाल्कनीत बुलेटप्रुफ गार्ड दिसून येतं. जिथून तो सर्व चाहत्यांना हात करतो तिथेच हे गार्ड लावण्यात आलं आहे. पण हे धमक्यांमुळे लावण्यात आलेलं नाही. ईटाइम्सशी बोलताना सलमान खान म्हणाला, "काही लोक बाल्कनीतून चढून येतात. त्यांना थांबण्यासाठी हे सेफगार्ड लावलं आहे. कारण कधी कधी मी लोकांना माझ्या बाल्कनीत झोपलेलं पाहिलं आहे."
काळवीट शिकारप्रकरणी लॉरेन्स बिष्णोईची गँग सलमानच्या मागे लागली आहे. अनेकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमक्यांवर काही दिवसांपूर्वीच सलमान म्हणालेला की, "अल्लाह आहे, त्याने जितकं वय लिहिलं आहे ते आहे. कधी कधी जितक्या लोकांना सोबत घेऊन चालावं लागतं. तितक्या अडचणीही वाढत जातात. इथेच प्रॉब्लेम होतो."
सलमान खान शेवटचा 'सिकंदर' सिनेमात दिसला. सध्या तो आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाच्या तयारित आहे. या सिनेमात तो भारतीय सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सध्या तो वजन घटवण्यासाठी कमालीची मेहनत घेत आहे. सिनेमात त्याच्यासोबत पहिल्यांदाच चित्रांगदा सिंह दिसणार आहे.