मुंबई - सिने अभिनेते सैफ अली खान यांना पाच दिवस उपचार घेतल्यानंतर लीलावती रुग्णालयातून मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे कुणाचाही आधार न घेता सैफ स्वतः चालत रुग्णालयाबाहेर पडला.
गेल्या आठवड्यात एका चोरट्याने मध्यरात्री त्याच्या घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता. त्यामध्ये गंभीर झालेल्या खान याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया केल्या होत्या. डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देऊन नियमित तपासणीसाठी आठवड्याने येण्याचा सल्ला दिला आहे.
हल्ल्यात सैफच्या मणक्यात चाकूचा तुकडा अडकला होता. रुग्णालयात करण्यात आलेल्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा काढण्यात आला. त्यासोबत मानेच्या उजव्या भागावर आणि डाव्या हाताच्या मनगटावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरावर सहा जखमा होत्या.
बुधवारी डिस्चार्ज देण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. सैफवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते त्याची प्रकृती उत्तम आहे. त्याला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात बोलविण्यात आले आहे.
आरोपीची टोपी पाेलिसांना सापडली अभिनेता सैफ अली खानचा धाकटा मुलगा जहांगीर अली खान म्हणजेच जेहच्या खोलीतून एक टोपी हस्तगत करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोपी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजादची आहे. टोपीत सापडलेले केस डीएनए विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (एफएसएल) पाठविण्यात आले आहेत. हल्ल्याच्या रात्री जेहच्या खोलीत मदतनिसाने घुसखोराला प्रथम पाहिले होते. त्याच ठिकाणी सैफ आणि आरोपीमध्ये झटापट झाली. त्यावेळी आरोपीची टोपी पडली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
हल्लेखोराला सोबत नेत पोलिसांकडून घटनेचे रिक्रिएशन वांद्रे येथे अभिनेता सैफ अली खान (५४) याच्या निवासस्थानी चाकूहल्ला केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी पुन्हा सद्गुरू शरण इमारतीमध्ये मंगळवारी नेले. याठिकाणी गुन्ह्याचे दृश्य (रिक्रिएशन) करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी पहाटे ५:३० च्या सुमारास चार पोलिस व्हॅनमध्ये २० अधिकाऱ्यांचे पथक सत्गुरू शरण इमारतीत पोहोचले आणि तासभर ते परिसरात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पोलिसांचे पथक आरोपी शरीफुल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर (३०) याच्यासोबत इमारतीच्या समोरच्या गेटमधून इमारतीत शिरले.
नंतर, त्यांनी त्याला वांद्रे रेल्वेस्थानकावर नेले. तेथून त्याने दादरला जाण्यासाठी ट्रेन पकडली होती. त्यानंतर तो एका बागेबाहेर झोपला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केल्यावर आणि आरोपी पळून गेलेल्या ठिकाणी गेल्यानंतर आरोपीला वांद्रे पोलिस ठाण्यात परत आणण्यात आले. तेथे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.