बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर अभिनेत्याला तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्लेखोराने सैफवर सहा वेळा वार केला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर दोन सर्जरी करण्यात आल्या. या सर्जरीसाठी जवळपास सहा तास लागले. यानंतर आता सैफला आयसीमधून एका स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.
सैफला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आधी स्पाईन आणि मग कॉस्मेटिक सर्जरी करण्यात आली. ६ तासांच्या सर्जरीनंतर शुद्धीवर येताच सैफने डॉक्टरांना दोन प्रश्न विचारले. मी शूटिंग करू शकेन ना? आणि मी जिम, वर्कआऊट करू शकेन ना? हे प्रश्न विचारले. अभिनेत्याच्या प्रश्नांना डॉक्टरांनीदेखील उत्तरं दिली.
तुम्ही २ आठवड्यांनंतर शूटिंग आणि व्यायाम सुरू करू शकता. पण तोपर्यंत तुम्हाला नीट आराम करावा लागला. बेड रेस्ट घेणं अत्यंत गरजेचं आहे, असं डॉक्टरांनी सैफला सांगितलं आहे. तसेच सैफला इन्फेक्शनचा धोका असल्याने त्याला भेटण्यासाठी फार कोणी जाऊ नये. जितक्या कमी व्यक्ती त्याला भेटायला जातील, तितकं त्याच्या प्रकृतीसाठी चांगलं असेल, असंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे.
हल्ल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. या अवस्थेत अभिनेत्याला रिक्षाने रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. कारण रात्री उशिरा घरात ड्रायव्हर नव्हता. ज्या रिक्षाने सैफ अली खान त्याचा मुलगा तैमूरसोबत रुग्णालयात पोहोचला होता त्याने त्या रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. रिक्षा चालकाने आपलं नाव भजन सिंह असं सांगितलं आहे. भजन सिंह म्हणतात की, तो उत्तराखंडचा आहे आणि गेल्या २० वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत. तो फक्त रात्री काम करतो.
चालकाच्या म्हणण्यानुसार, सैफ अली खान, त्याचा मुलगा तैमूर आणि आणखी एक व्यक्ती इमारतीच्या गेटबाहेर आल्यावर त्याने त्यांना रिक्षात बसवलं. अभिनेत्याने चालकाला विचारलं होतं की, रुग्णालयात पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल?चालकाने असंही सांगितलं की, सैफ अली खानने त्यावेळी पांढरा कुर्ता घातला होता, जो पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. तो त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीशी बोलला आणि रिक्षा चालकाला रिक्षा लीलावती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितली.
चालक म्हणतो की, त्याला माहीत नव्हतं की, त्याच्या रिक्षामध्ये बसलेला जखमी व्यक्ती अभिनेता सैफ अली खान आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतर रिक्षामधून खाली उतरल्यावर सैफने गार्डला सांगितलं की, "मी सैफ अली खान आहे, लवकर स्ट्रेचर आणा." त्यावेळी रिक्षा चालकाला तो सैफ अली खान असल्याचं समजलं. सध्या सैफची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.