Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एक दिन’मधील नवं गाणं ‘ख्वाब देखूं’प्रदर्शित, साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या जादुई केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:08 IST

‘एक दिन’ने आपल्या झलक आणि शीर्षक गीतामुळे आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक नवं गाणं ‘ख्वाब देखूं’ प्रदर्शित झालं असून, ते प्रेक्षकांना रोमँसच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जातं.

आमिर खान निर्मित ‘एक दिन’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पडद्यावर एक गोड प्रेमकथा घेऊन येणाऱ्या या चित्रपटाने आपल्या झलक आणि गाण्यांमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच मालिकेला पुढे नेत ‘ख्वाब देखूं’ हे नवे गाणे सादर करण्यात आले आहे, जे जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्यात उमलणाऱ्या प्रेमाच्या जादुई दुनियेत घेऊन जाते.

‘एक दिन’मधील ‘ख्वाब देखूं’ हे गाणे ऐकायला अतिशय शांत आणि मनाला भिडणारे आहे. निसर्गरम्य ठिकाणी चित्रित केलेले हे गाणे साई आणि जुनैद यांच्या हळूहळू पुढे सरकणाऱ्या प्रेमकथेचे सुंदर चित्रण करते. यात आपण लाजाळू आणि साधा स्वभाव असलेला जुनैद, चुलबुली आणि मोहक साईच्या प्रेमात पडताना पाहतो. दोघांमधील हा निरागस रोमँस आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळतो. गाणे आपल्या शांत आणि रोमँटिक भावनेला पूर्णपणे जपते. अरिजीत सिंह आणि तरन्नुम मलिक जैन यांच्या मोहक आवाजात सजलेले हे गाणे राम संपत यांनी संगीतबद्ध केले असून, त्याचे बोल इरशाद कामिल यांनी लिहिले आहेत. अरिजीत यांचा भावपूर्ण आवाज थेट मनाला स्पर्श करतो आणि प्रेमाची खरी भावना जागवतो, ज्यामुळे या सुंदर प्रेमकथेची उत्सुकता अधिक वाढते.

‘एक दिन’च्या निमित्ताने आमिर खान आणि दिग्दर्शक मंसूर खान दीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र येत आहेत. ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक मानली जाते. या दोघांनी प्रेक्षकांना ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जाने तू... या जाने ना’ यांसारखे संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. ‘एक दिन’द्वारे ही जोडी पुन्हा एकदा रोमँटिक प्रकारात परतत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे प्रेक्षक पडद्यावर जुने जादू पुन्हा अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत.

आमिर खान निर्मित ‘एक दिन’मध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून, निर्मिती आमिर खान, मंसूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ‘Ek Din’s ‘Khwaab Dekhun’ Released: Sai Pallavi, Junaid Khan's Chemistry Shines

Web Summary : Aamir Khan's 'Ek Din' unveils 'Khwaab Dekhun,' showcasing the blossoming romance between Junaid Khan and Sai Pallavi. The song, sung by Arijit Singh, highlights their innocent chemistry. Aamir Khan and Mansoor Khan reunite, raising anticipation for this romantic film, set to release May 1, 2026.
टॅग्स :साई पल्लवीजुनैद खान