Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्टनरबरोबर सुखी संसार करायचाय? रितेश देशमुखने दिल्या टिप्स, म्हणतो- "भांडण करतानाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 13:25 IST

जिनिलीया-रितेशच्या सुखी संसाराचं रहस्य काय? असा प्रश्न अनेकदा अभिनेत्याला विचारला जातो. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्याने भाष्य केलं आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या दादा-वहिनींकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. रितेश आणि जिनिलीया यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. त्यांचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात. केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर कित्येकदा कृतीतूनही त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. जिनिलीया-रितेशच्या या सुखी संसाराचं रहस्य काय? असा प्रश्न अनेकदा अभिनेत्याला विचारला जातो. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्याने भाष्य केलं आहे.

रितेशने नुकतंच शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याला सुखी संसाराच्या रहस्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याच उत्तर देताना रितेश म्हणाला, "मला वाटतं की सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या पार्टनरचा आदर केला पाहिजे. त्याला आदर दिला पाहिजे. नॉर्मल आयुष्यातच नाही तर भांडणातही तुम्ही पार्टनरचा अनादर केला नाही पाहिजे. त्याबरोबरच तुमच्या नात्यात सेन्स ऑफ ह्युमर असला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर हसता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पार्टनरच्या गरजांना तुम्ही तुमच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व दिलं पाहिजे. हे दोघांनीही केलं पाहिजे".

जिनिलीया आणि रितेशने २०१२ साली लग्न करत संसार थाटला. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याला राजकारणी आणि सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. गेली १२ वर्ष ते सुखाने संसार करत आहेत. त्यांना रियान आणि राहिल ही दोन मुले आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सध्या 'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आहे. रितेश या नव्या सीझनचं होस्टिंग करत आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेता