Join us

Riteish Deshmukh: ‘काळजी घेणारे मुख्यमंत्री...,’ अभिनेता रितेश देशमुखनं मानले उद्धव ठाकरेंचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:51 IST

Riteish Deshmukh, Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. अभिनेता रितेश देशमुख यानेही एक पोस्ट शेअर केली आहे.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात काल शिंदे सरकार आलं. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण त्याआधी दहा दिवस राज्यातील राजकीय गोटात अभूतपूर्व घडामोडी होताना दिसल्या. राज्याचं राजकारण अक्षरश: ढवळून निघालं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारल्यानंतर  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या  नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. अगदी कलाकार मंडळीही यावर व्यक्त झालेत.  

 अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यानेही या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच  व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये रितेशने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आभार मानले आहेत. 

काळजी घेणारे मुख्यमंत्री...

‘महाराष्ट्राचे पुरोगामी, कृतीशील आणि काळजी घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचे खूप खूप आभार. मानवतेनं आजवरच्या सर्वात कठीण काळात करोना साथीच्या आजाराशी सामना करताना, आम्हा नागरिकांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आभार,’ अशा आशयाची पोस्ट रितेशनचे शेअर केली. (Riteish Deshmukh Post on Uddhav Thackeray)

नवे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छारितेशने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारी पोस्टही शेअर केली. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर रितेशने द्वयींचे अभिनंदन करत, त्यांना शुभेच्छा दिल्यात.

   28 नोव्हेंबर 2019 रोजी  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली होती. गेल्या महिन्यात महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षांचाकालावधी पूर्ण केला होता. आमचं सरकार  पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, त्याआधीच एकनाथ शिंदे यांनी बंडाची भूमिका घेतली आणि शिवसेनेचे आमदार फुटले. यामुळे उद्धव ठाकरे यांना  राजीनामा द्यावा लागला.

टॅग्स :रितेश देशमुखउद्धव ठाकरेमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष