Join us
Daily Top 2Weekly Top 5

Khuda Hafiz Movie Review: कथेलाच ‘खुदा हाफिज’ !

By सुवर्णा जैन | Updated: August 8, 2023 19:47 IST

'खुदा हाफिज' सिनेमात अभिनेता विद्युत जामवाल आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांची मुख्य भूमिका आहे.

Release Date: August 14, 2020Language: हिंदी
Cast: विद्युत जामवाल, शिलीका ओबेरॉय, अन्नू कपूर, आहाना कुमरा आणि शिव पंडित
Producer: पनोरमा स्टुडिओDirector: फारूक कबीर
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन

ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉस्टारवर ‘खुदा हाफिज’ सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा एक नुकतेच लग्न झालेल्या जोडप्याची कथा आहे. अभिनेता विद्युत जामवालने समीर चौधरी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर समीरच्या पत्नीची नरगिस ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयने साकारली आहे. लग्नानंतर या दोघांचा सुखाचा संसार सुरू होत नाही, तोवर त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहते. सिनेमात 2008 साली आलेल्या मंदीचा काळ दाखवण्यात आला आहे. जगात सर्वत्र आर्थिक मंदीची लाट पसरते . त्याचा फटका समीर आणि नरगिसलाही बसतो. दोघांच्याही नोक-या जातात. त्यामुळे समीर आणि नरगिस दोघेही परदेशात नोकरी शोधतात. एका एजंटमार्फत नोमानमध्ये दोघांना नोकरी मिळाल्याचे सांगितले जाते. समीर आधी नरगिस नोमानला रवाना होते. नोमानमध्ये पोहचताच तिला भलत्याच ठिकाणी नेले जाते आणि तिथूनच सिनेमाला खरी सुरूवात होते. नरगिस परदेशात सुरक्षित नसल्याचे कळताच समीरही पत्नीच्या शोधात नोमानला रवाना होतो. पत्नीच्या शोध घेण्यासाठी त्याला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो? सत्य ऐकल्यानंतर समीरची काय अवस्था होते ? परदेशात त्याला कोणाची मदत मिळते ? कठीण प्रसंगी त्याला भारतीय दूतावासाकडून कशाप्रकारे मदत केली जाते? समीर आणि नरगिसची भेट होते का? या सगळ्या घडामोडींवर हा सिनेमा आहे.

दिग्दर्शक फारुख कबीर यांनी सिनेमासाठी लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी बाजु सांभाळली आहे.  सगळ्या कलाकारांकडून चांगला अभिनय करून घेण्यात ते यशस्वी ठरले आहे. मात्र कथेतील त्रुटींमुळे सिनेमा तितका प्रभावशाली वाटत नाही. सिनेमाचा पूर्वार्ध रसिकांना जागेवर खिळवून ठेवण्यात काहीसा यशस्वी ठरतो. मात्र उत्तरार्ध काहीसा रटाळ वाटतो. त्यातही  क्लायमॅक्स पाहून रसिकांची पुरती निराशाच होते. समीरला नरगिसचा शोध घेताना ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे . ते पाहून रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अनेकदा सिनेमा पाहताना आता या पुढे काय होणार ? या गोष्टी आधीच आपल्याला समजतात. त्यामुळे पुढे काय होणार ? हा सस्पेंस पाहण्यासाठी जास्त उत्सुकता राहात नाही. दिग्दर्शकाने रसिकांना खूश करण्यासाठी दाखवलेले सीन तर्कसंगत वाटत नाहीत.त्यातही नायकाला खलनायकापर्यंत पोहोचण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. सगळ्या गोष्टी नायकासाठी सहज साध्य होतात. त्यामुळे  कथेतील उत्कंठा, रोमांच कमी होते. संगीत प्रभावी असून त्यामुळे कथेशी चटकन कनेक्ट होता येतं तितकेच काय या सिनेमाची जमेची बाजू म्हणावी लागेल.

अभिनेता विद्युत जामवालनं पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स दिला आहे. शिवालिका ओबरॉयची भूमिका फारशी छाप पाडत नाही.  तिच्या व्यक्तिरेखेला आणखी वाव देता आला असता. तर दुसरीकडे आहाना कुमराने साकारलेली अरबी पोलिस अधिकारीची भूमिका लक्षवेधी ठरते. तिने आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. खास करून अरबी संवादानं तिने छाप पाडली आहे. शिव पंडितही अरब पोलिस अधिका-याच्या भूमिकेत चपखल बसतो. विशेष म्हणजे शिव पंडितच्या भूमिकेत कमालीचा ट्वीस्ट देण्यात आल्याने रसिकांची त्याला पाहताना उत्सुकता वाढते. यात अन्नू कपूर यांनी उस्मान अली मुराद ही  भूमिका मोठ्या खूबीने साकारली आहे. या भूमिकेत अन्नू कपूर यांचा अभिनय म्हणजे सिनेमाची मोठी जमेची बाजू.  पूर्ण सिनेमासाठी विशेष कौतुक करावं लागेल ते विद्युत जामवालचं. त्याच्यामुळेच काही काळ रसिक खिळून राहतात. मात्र कथानकात थोडा दम असता आणि काही गोष्टी वगळल्या असत्या तर ‘खुदा हाफिज’ नक्कीच आणखी चांगला झाला असता असं राहून राहून वाटतं.

 

टॅग्स :विद्युत जामवाल