सुजित शिर्के>>>
गावात घडणाऱ्या रहस्यमयी घटनांवर आधारीत रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित 'सालबर्डी' चित्रपटाबद्दल सर्वांना कुतुहल होतं. अंधश्रद्धेमुळे घडलेल्या वास्तव घटनांचा शोध घेणारा हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. कसा आहे 'सालबर्डी'? जाणून घ्या
कथानक: महाराष्ट्रातील ‘सालबर्डी’ या गावात घडणारी रहस्यमय घटना या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. या गावामध्ये काळ्या जादूच्या प्रभावाखाली अनेक गुन्हे घडतात. या भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेण्यासाठी सरकारद्वारे पोलीस अधिकारी मनोरमाची (पूजा सावंत) नियुक्ती केली जाते. या प्रकरणाचा तपास करत असताना तिच्यासमोर अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतो. पुढे मनोरमा गावातील या घटनांमागच्या सूत्रधाराला कशी पकडते? याची कहाणी ‘सालबर्डी’ सिनेमात दिसते.
लेखन-दिग्दर्शन: दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी ‘सालबर्डी’ या रहस्यपटाचं शिवधनुष्य पेललं आहे. सुरुवातीला काही घटनांचे संदर्भ पटकन लागत नाहीत. पण, मध्यंतरानंतर जसजसं कथानक पुढे सरकतं तसतशी या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढत जाते. रहस्यमयी कथा सांगताना काळ आणि मांडणीत काही ठिकाणी विसंगती जाणवते. 'सालबर्डी'मधील प्रत्येक गोष्ट सत्य वाटावी यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली असल्याचं दिसून आलं.
अभिनय: अभिनेत्री पूजा सावंतला खाकी वर्दीत बघणं ही एक पर्वणी आहे. पूजाने तिची भूमिका दमदारपणे साकारली असून पोलीस अधिकारी म्हणून तिचा दबदबा दाखवला आहे. शशांक शेंडे यांनी साकारलेला गावचा सरपंच लक्षात राहणारा आहे. ओंकार भोजने, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे यांच्या अभिनयामुळे चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांच्या मनावर आणखी परिणाम साधतं. छोट्याश्या भूमिकेतही माधव अभ्यंकर छाप सोडतात.
सकारात्मक बाजू: प्रमुख कलाकारांचा अभिनय, संगीत, दिग्दर्शन
नकारात्मक बाजू: ताणलेले प्रसंग, संथ गती
थोडक्यात काय तर, मराठीमध्ये अलीकडच्या काळात बरेच रहस्यपट आले. त्यामध्ये 'सालबर्डी' हा चांगला प्रयत्न म्हणता येईल. 'सालबर्डी'च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक वेगळं कथानक सादर करण्यात आलं आहे. कलाकारांच्या अभिनयामुळे 'सालबर्डी' रंजकता निर्माण करण्यात यशस्वी होतो. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्कीच पाहू शकता.