सत्य घटनांवर आधारलेला हा चित्रपट म्हणजे भारताने पाकिस्तानातील आतंकवादाच्या मुळावर घातलेला घाव आहे. शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करणाऱ्या एजंटची रोमांचक कामगिरी चित्रपटात आहे. 'उरी'च्या यशानंतर दिग्दर्शक आदित्य धरने पडद्यामागच्या हेरगिरीची स्टोरी सादर केली आहे. मायभूमीपासून दूर शत्रूच्या देशात राहून हेरगिरी करणे सोपे नाही. मार्चमध्ये या चित्रपटाचा पुढील भाग येणार आहे.कथानक - कथा १९९९मधील कंदाहार विमान अपहरणापासून सुरू होते. आयबी चिफ अजय संन्याल अतिरेक्यांशी बोलणी करण्यासाठी पोहोचतात. तेच अतिरेकी पुन्हा२००१मध्ये संसदेवर हल्ला करतात. अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी संन्याल सरकारला मिशन धुरंधरची फाईल देतात. अखेर २००४ मध्ये त्याची सुरुवात होते आणि चित्रपटाचा नायक हमजा अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानातील लियारीमध्ये पोहोचतो. तो अंडरवर्ल्ड डॅान रेहमान डकैतच्या टोळीत सामील होतो. त्यानंतर कशाप्रकारे हेरगिरी करतो ते चित्रपटात आहे. लेखन-दिग्दर्शन - भारतीय इंटेलिजन्सवर आदित्यने इंटेलिजन्ट सिनेमा बनवला आहे. आजवर असंख्य गुप्तहेरांनी देशासाठी प्राणांची बाजी लावत शत्रूच्या गोटात घुसून हेरगिरी केली, पण त्यांचे नाव कुठेही आलेले नाही. हा चित्रपट केवळ त्याची एक झलक आहे. वेगवेगळ्या प्रकरणांच्या माध्यमांतून पटकथा पुढे सरकते. सुरुवातीला गती संथ आहे. रेहमानच्या वडीलांचा पाठलाग करण्याच्या दृश्यापासून चित्रपट खऱ्या अर्थाने पकड घेऊ लागतो. मध्यंतरानंतर घटना वेगात घडतात. प्रेमकथेमागचा उद्देशही पटण्याजोगा आहे. अफलातून वेशभूषा आणि धडाकेबाज अॅक्शन या जमेच्या बाजू आहेत. 'घर मे घुसेंगे भी और मारेंगे भी...', 'रेहमान डकैत की दी हुई मौत कसाईनुमा होती है...' सारखे काही डायलॅाग चांगले आहेत. 'ना तो कारवा की तलाश है...'सह इतर गाणी श्रवणीय आहेत. बोलीभाषेत पाकिस्तानी लहेजा जाणवत नाही.
अभिनय - हमजा म्हणजेच जसकीरत सिंग रागी ही व्यक्तिरेखा रणवीर सिंगने जीवंत केली आहे. घातक लूक व सहजसुंदर अभिनयाद्वारे रणवीरने हमजा अधिक सुंदररीत्या सादर केला आहे. अक्षय खन्नाने नेहमीच्या शैलीत अत्यंत कमी बोलून डोळे आणि चेहऱ्यावरील हावभावांद्वारे थरारक अभिनय केला आहे. देखण्या सारा अर्जुनने साकारलेली यालीया लक्ष वेधते. अजित डोभाल यांच्या गेटअपमधील आर. माधवनने संन्याल यांच्या व्यक्तिरेखेत सुरेख रंग भरले आहेत. राकेश बेदी यांनी रंगवलेला राजकारणी जमील जमाली जबरदस्त आहे. अर्जुन रामपालने निर्दयी मेजरची भूमिका क्रूरपणे साकारली आहे. संजय दत्त पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीत भाव खाऊन जातो.सकारात्मक बाजू - वेशभूषा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी, अॅक्शन, वेशभूषा, व्हीएफएक्स, गीत-संगीतनकारात्मक बाजू - सिनेमाची गती, बोलीभाषा, पोलीसांचा पाठलाग पाकिस्तानातील रस्त्यांवरील वाटत नाही.थोडक्यात काय तर पडद्यामागे घडलेली हेरगिरीची ही गोष्ट अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी असल्याने मोठ्या पडद्यावर पाहण्यातच खरी मजा आहे.