"मेरा नसीब इतना अच्छा है की मुझे शिवाजी जैसा दुश्मन मिला" या एका वाक्यातच सगळं सार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा सिनेमा म्हणजे 'रणपति शिवराय : स्वारी आग्रा'. दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकमधील हे सहावे पुष्प केवळ शिवरायांचा गनिमी कावाच दाखवत नाही तर शत्रूच्या तोंडातून त्याला चकवा देत अत्यंत हुशारीने तिथून बाहेर पडताना महाराजांच्या बुद्धीचातुर्याचा लागलेला कस, याचे साक्षात दर्शन घडवतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा स्वारी आणि तिथून संभाजी महाराजांसोबत झालेल्या सुटकेचा थरार यावर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा पाहावा का? दिग्पाल लांजेकरांच्या आधीच्या सिनेमांप्रमाणे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल का? जाणून घेऊया.
कथानक : सिनेमाची सुरुवात क्रूर औरंगजेबाने स्वत:च्याच भावाची हत्या करत आग्र्याची हुकुमत बळकावल्यापासून होते, तर दुसरीकडे स्वराज्याचा पोशिंदा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडते. कथानक मूळ कथेपर्यंत येईस्तोवर मधे बराच काळ जातो. यासाठी पुरंदरचा तह, महाराजांनी सूरत लुटली असे अनेक संदर्भ कथा समजण्यासाठी देण्यात आले आहेत. सुरुवातीला काही अॅक्शन सीनही सिनेमात दिसतात. त्याने सिनेमाची रंगत वाढते. शिवरायांना आग्रा स्वारी का करावी लागली? क्रूर औरंगजेबाला भेटण्यासाठी ते का गेले? यामागे त्यांची काही छुपी योजना होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हळूहळू सिनेमात उलगडत जातात. शिवरायांचा गनिमी कावा, त्यांच्या मावळ्यांचे शौर्य याचे दर्शन आपसूकच सिनेमात घडले आहे. पण या सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे आत्तापर्यंत कधीही न पाहिलेली राजमाता जिजाऊंची भावनिक बाजू या सिनेमातून मांडण्यात आली आहे. त्याबरोबरच शत्रूसाठी डोळ्यातून आग ओकणारे, पण प्रसंगी मावळे, आपले साथीदार आणि छोट्या शंभू महाराजांसाठी भावुक होणारे शिवाजी महाराजही सिनेमात दिसतात.
लेखन-दिग्दर्शन : सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. कथा आणि पटकथा यांची मांडणी उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. पण सुरुवातीच्या काही घटनांचे मूळ कथेशी संदर्भ लावणे कठीण जाते. सिनेमातील गाणी ही प्रसंगानुरुप उत्तम प्रकारे चित्रीत केली गेली आहेत. शिवरायांच्या 'स्वारी आग्रा'मधून दिग्दर्शकाने ट्विस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांना जो अनपेक्षित धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे तो सफल झाल्याचे दिसते.
अभिनय : 'रणपति शिवराय' सिनेमात सर्वात महत्त्वाचा बदल, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याने साकारणे. या सिनेमात शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसतात. जे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा अभिजीत श्वेतचंद्रचा प्रयत्न पुरेपूर सफल झाल्याचे पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या अपेक्षेस तो खरा उतरल्याचे दिसते. राजमाता जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाच्या भावनिक पैलूचं दर्शन घडवणाऱ्या मृणाल कुलकर्णींचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत असलेल्या दिग्पाल लांजेकरांनी भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. तर समीर धर्माधिकारी यांनी साकारलेला क्रूर औरंगजेब अंगावर आल्याशिवाय राहत नाही. इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
सकारात्मक बाजू : आजपर्यंत शिवरायांच्या आग्रा स्वारीची गोष्ट आपल्याला माहीत होती. पण, त्यापलीकडे जाऊन त्यामागचा महाराजांचा विचार काय असू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
नकारात्मक बाजू : छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक सिनेमा असल्यामुळे अॅक्शनची अपेक्षा ठेवून सिनेमागृहात जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा काहीसा निराशाजनक ठरू शकतो.
थोडक्यात काय तर, तुम्हाला दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकमधील सिनेमे आवडले असतील तर हा सिनेमाही आवडेल. याशिवाय शिवरायांची आग्रा स्वारीची पडद्यामागची कहाणी पाहण्यासाठी हा सिनेमा एकदा तरी सिनेमागृहात पाहायलाच हवा.