‘परम सुंदरी’ ही एक आजच्या काळातील आणि थोडी जुन्या आठवणींना स्पर्श करणारी प्रेम कहाणी आहे. परम (सिद्धार्थ मल्होत्रा) हा दिल्लीतील स्मार्ट, थोडा सेल्फ-ऑब्सेस्ड असा तरुण बिझनेसमन आहे. त्याचे वडील (संजय कपूर) श्रीमंत असूनही त्याला जीवनाचे खरे मूल्य समजवण्याचा प्रयत्न करतात. परम तंत्रज्ञानावर जास्त विश्वास ठेवणारा आहे. त्याला वाटते की प्रेमही गणिती सूत्रांनी आणि डेटा अल्गोरिदमने ठरू शकते.
म्हणूनच तो "बेस्ट पार्टनर शोधून देण्याचा" दावा करणाऱ्या एक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतो. परंतु वडील त्याला आव्हान देतात की आधी स्वतःला खरा जोडीदार शोधून दाखव. हाच क्षण त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरतो आणि इथेच सुंदरी (जान्हवी कपूर) त्याच्या आयुष्यात येते. सुरुवातीला दोघांचे वाद, मग हळूहळू समजूतदारपणा आणि त्यानंतर उलगडणारे प्रेम अशी ही प्रवासगाथा खूपच गोडपणे दाखवली आहे. यामध्ये अनेक ट्विस्ट-टर्न्स, विनोदाचा शिडकावा आणि भावविव्हल करणारे क्षण यामुळे कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते.लेखन-दिग्दर्शन :
तुषार जलोटा यांनी कथा अनावश्यक वळण न देता साधेपणाने मांडली आहे. पटकथेत हलक्या फुलक्या संवादांसोबत काही गंभीर भावनिक क्षणही आहेत. कथानकात दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यातील थोडेसे सांस्कृतिक भांडणपण आहे. ते थेट ‘चेन्नई एक्सप्रेस’ची आठवण करून देते. पण तरीही त्यापासून स्वत:चे वेगळेपणही मांडते. सिनेमा काही ठिकाणी थोडा संथ झाला आहे, तर काही दृश्यांची गरज नव्हती. तरीही एकूण परिणामकारकता टिकून राहते.
अभिनय :
सिद्धार्थ मल्होत्रा या भूमिकेत अगदी फिट बसला आहे. त्याचे कॉमिक टायमिंग, स्टाइल आणि इमोशनल दृश्यांतील प्रामाणिकपणा या सर्व गोष्टींमुळे ‘परम’ हे पात्र जिवंत वाटते. मात्र जान्हवी कपूरने ‘सुंदरी’च्या भूमिकेत नाटकीपणा टाळून अगदी नैसर्गिक अभिनय केला आहे. तिचे उच्चार, हावभाव विशेष म्हणजे डोळ्यांतून झळकणारी निरागसता प्रेक्षकांना मोहवून टाकते. सिद्धार्थ-जान्हवीची केमिस्ट्री अतिशय नैसर्गिक दिसते. सुरुवातीचा तणाव आणि नंतरची जवळीक हा प्रवास पडद्यावर सुंदररीत्या उमटतो. संजय कपूर यांनी वडिलांच्या भूमिकेत हलक्याफुलक्या शैलीत परिणामकारक अभिनय केला आहे. मनजोत सिंह, इनायत वर्मा, रेनजी पणिक्कर आणि सिद्धार्थ शंकर यांनी सुंदरीच्या कुटुंबातील भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.
गीत-संगीत : संगीत हा या सिनेमाचा आत्मा आहे. ‘परदेसिया’, ‘भीगी साडी’, ‘डेंजर’, ‘चांद कागद का’ आणि ‘सुन मेरे यार वे’ ही गाणी कथा पुढे नेण्यासोबत प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. टायटल ट्रॅक ‘सुंदरी के प्यार में’ आधीच लोकप्रिय ठरलेला आहे. बॅकग्राउंड स्कोरही उत्तम आहे.-सकारात्मक बाजू : सिद्धार्थ-जान्हवीची अप्रतिम केमिस्ट्री, नैसर्गिक अभिनय आणि भावनिक प्रसंग, हृदयाला भिडणारे संगीत व गाणी, दिग्दर्शनातील साधेपणा.-नकारात्मक बाजू : काही अनावश्यक प्रसंग, संथ गती, आधी पाहिलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती-थोडक्यात : दिनेश विजान निर्मित ‘परम सुंदरी’ ही एक हलकीफुलकी पण हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी आहे. नवी जोडी, उत्तम संगीत आणि साध्या पण परिणामकारक दिग्दर्शनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल. ज्यांना प्रेमकथा, भावनिक ट्विस्ट आणि गोड केमिस्ट्री पाहायला आवडते त्यांनी नक्कीच हा चित्रपट अनुभवावा.