Join us

दूर गेलेल्या बाबाच्या परीची हृदयद्रावक गोष्ट, कसा आहे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'? वाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Updated: February 2, 2025 11:14 IST

बालकलाकार मायरा वायकुळची भूमिका असलेला मुक्काम पोस्ट देवाचं घर सिनेमा कसा आहे? जाणून घ्या (mukkam post devach ghar)

Release Date: January 31, 2025Language: मराठी
Cast: मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सचिन नारकर, उषा नाडकर्णी, कमलेश सावंत, स्पृहा परब, माधवी जुवेकर, सविता मालपेकर
Producer: महेशकुमार जायसवाल, किर्ती जायसवालDirector: संकेत माने
Duration: एक तास ५९ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

संकेत मानेच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट समाज आणि शासकीय व्यवस्थेला आरसा दाखवणारा आहे. वीर जवानांच्या कुटुंबाचा मुद्दा त्याने हसत-खेळत एका मुलीच्या माध्यमातून सादर केला आहे, जो चित्रपट पाहताना मनाला भिडतो. कित्येक ठिकाणी भावूक करतो आणि त्यासोबतच समाजातील विविध मुद्द्यांवरही प्रहार करतो. 

कथानक : देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानाची दुसऱ्या इयत्तेतील जिजाची ही गोष्ट आहे. आई शेतात मोलमजूरी करून एकीकडे घरखर्च भागवते, तर दुसरीकडे नवऱ्याची पेन्शन सुरू न झाल्याने अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी पाच हजार रुपये जमा करत असते. जिजाला मुख्याध्यापक 'बाबा' या विषयावर भाषण करायला सांगतात. त्यामुळे ती बाबाचा शोध घेऊ लागते, तेव्हा बाबा देवाघरी गेल्याचे तिला समजते. मग बाबाशी संवाद साधण्यासाठी ती पत्र पाठवते. त्यानंतर दूरदेशी गेलेल्या सुपरमॅन बाबाच्या परीची हृदयद्रावक गोष्ट पाहायला मिळते. 

लेखन-दिग्दर्शन : विषय खूप छान आहे. भ्रष्ट सरकारी व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कितीतरी वीर जवानांच्या कुटुंबांचे प्रतिनिधीत्व करणारी ही गोष्ट आहे. यातील काही भावनिक दृश्ये हृदय पिळवटतात. आपल्या व्यक्तीसाठी कोणीही सुपरमॅन होतो, पण इतरांसाठी सुपरमॅन होता आले पाहिजे हा मोलाचा संदेश या सिनेमात देण्यात आला आहे. ग्राम स्वच्छता अभियान, आई-वडिलांना वाईट वागणूक, पळून जाऊन लग्न करणाऱ्या पालकांची व्यथा, मूल दत्तक घेण्याच्या अटी आदी मुद्दे योग्य रितीने हाताळले आहेत. चिनार-महेश यांचे संगीत गोड आहे. रोहन मडकईकरांचे छायांकन शब्दांविना बरेच काही सांगणारे आहे. बाप्याचे रहस्य उलगडणारा ट्वीस्ट अतिशय सुंदर आहे.

अभिनय : मायरा वायकूळने साकारलेल्या जीजामधील अल्लडपणा, निरागसता आणि परीपक्वता मनाला भिडते. कल्याणी मुळेने आईच्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय दिला आहे. मंगेश देसाईने साकारलेला पोस्टमनकाका दमदार आणि प्रेमळ आहे. स्पृहा परबने जीजाची मैत्रीण शुभी सुरेखरीत्या रंगवली आहे. प्रथमेश परब आणि रेशम श्रीवर्धनची जोडी गुलाबी अँगल जोडणारी आहे. उषा नाडकर्णींनी नेहमीच्या कडक शैलीत सरपंच आजी साकारली आहे. पोलिसी खाक्या दाखवत कमलेश सावंत छोट्याशा भूमिकेत भाव खाऊन गेला आहे. सचिन नारकरने साकारलेल्या वेड्या बाप्याच्या कॅरेक्टरसाठी शब्द अपुरे पडतात. माधवी जुवेकर, सविता मालपेकर यांनी चांगली साथ दिली आहे. 

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन, लोकेशन्स, प्रकाश योजनानकारात्मक बाजू : मसालापटांच्या चाहत्यांची निराशा होईल.थोडक्यात काय तर देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या काही वीर जवानांच्या कुटुंबियांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात याचे मन हेलावणारे चित्रण अवश्य पाहायला हवे.

टॅग्स :मायरा वैकुलमराठी चित्रपट