रणवीर सिंगची सध्या चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाला मुलगी झाली. याशिवाय 'सिंघम अगेन' निमित्ताने रणवीरने 'सिंबा'च्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. रणवीर सिंगचा सोलो सिनेमा मात्र गेले अनेक महिने रिलीज झाला नाहीये. २०२३ मध्ये रणवीरचा आलिया भटसोबतचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा रिलीज झालेला. त्यानंतर रणवीरची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच रणवीरची भूमिका असलेल्या बहुचर्चित Don 3 बद्दल मोठी अपडेट समोर आलीय.
Don 3 कधी रिलीज होणार?
फरहान अख्तर दिग्दर्शित रणवीर सिंगच्या आगामी Don 3 ची अधिकृत घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. 'डॉन'च्या आधीच्या दोन भागांमध्ये झळकलेल्या शाहरुख खानऐवजी Don 3 मध्ये रणवीरची वर्णी लागली. पण नुकत्याच आलेल्या माहितीनुसार Don 3 लांबणीवर गेल्याचं समजतंय. Don 3 चं शूटिंग जानेवारी २०२५ पासून सुरु होणार होतं. परंतु नियोजित तारखेनुसार Don 3 चं शूटिंग सुरु होणार नाहीये. शूटिंग लांबणीवर गेल्याने सिनेमाची रिलीज डेटही अनेक महिन्यांनी पुढे गेलीय. आता हा सिनेमा २०२६ ला रिलीज होईल असं बोललं जातंय.
रणवीर सिंग सध्या काय करतोय?
रणवीर सिंग सध्या 'सिंघम अगेन'मध्ये 'सिंबा'च्या भूमिकेत दिसला. आता रणवीर सिंग 'उरी', 'आर्टिकल ३७०' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत आगामी सिनेमात झळकणार आहे. या दोघांनी सिनेमाचं शूटिंग सुरु करण्यापूर्वी काल गोल्डन टेंपलमध्ये जाऊन दर्शन घेतलं. हा सिनेमा कोणता हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा भारतीय सुरक्षेवर आधारीत असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.