बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगने आपल्या अभिनयाने व स्टाईल स्टेटमेंट रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. त्याचा चाहता वर्गदेखील खूप मोठा आहे. मात्र आता रणवीरने त्याला कोणती अभिनेत्री आवडते, हे सांगितले. तुम्हालाही ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना. रणवीरने दीपिका पादुकोणचे नाव न घेता चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव घेतले आहे. ही अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.
अमृता खानविलकरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रणवीर तिच्याबद्दल बोलतो आहे. तो व्हिडिओत म्हणाला की, 'मनोरंजन विश्वातली माझी सर्वांत आवडती अभिनेत्री आहे अमृता खानविलकर. ती अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान आहे.' रणवीरने अमृतासाठी अचानक हा व्हिडिओ शूट का केला असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. यामागचे कारण म्हणजे अमृता 'सुपर डान्सर महाराष्ट्र' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याने रणवीरने तिला या व्हिडिओमार्फत शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता खानविलकर आणि रणवीर सिंग यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यांची ही मैत्री पुन्हा एकदा या व्हिडिओतून पाहायला मिळाली.