Join us  

विराट-अनुष्काप्रमाणे रणवीर-दीपिकाही इटलीत विवाह बंधनात अडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 2:55 PM

रणवीर-दीपिकाच्या निकटवर्तीयानं दिली माहिती

मुंबई: अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद अहुजा यांच्या लग्नानंतर आता बॉलीवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग या वर्षी विवाह बंधनात अडकणार असल्याचं वृत्त एका आघाडीच्या दैनिकानं दिलं आहे. नोव्हेंबरमध्ये हे दोघे लग्न करणार असून त्याची तयारी दोघांच्या कुटुंबांकडून सुरू झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे दोघेही क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माप्रमाणे इटलीत विवाहबद्ध होण्याची शक्यता आहे. दीपिका तिच्या आईसोबत शॉपिंग करत असल्याचे फोटो गेल्याच आठवड्यातून पाहायला मिळाले होते. सुरुवातीला दीपिका आणि रणवीर स्वित्झर्लंडमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. रणवीर स्विझ टुरिझमचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर असल्यानं या दोघांचं लग्न स्वित्झर्लंडमध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र नव्या माहितीनुसार, या दोघांचं लग्न विराट आणि अनुष्का प्रमाणेच इटलीत होऊ शकतं. प्रसारमाध्यमांनी लग्नाचं वार्तांकन व्हावं, असं रणवीर आणि दीपिकाला वाटत नाही, अशी माहिती दोघांच्या निकटवर्तींयांच्या हवाल्यानं वृत्तपत्रानं दिली आहे. 'सुरुवातीला या दोघांचं लग्न स्वित्झर्लंडमध्ये होणार, अशी चर्चा होती. रणवीर स्विझ टुरिझमचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर असल्यानं त्याबद्दल तिथल्या सरकारसोबत बोलणं सुरू होतं. त्यामुळे काही माध्यमांनी विवाह स्वित्झर्लंडमध्ये होणार, असं वृत्त दिलं होतं. मात्र आता रणवीर-दीपिका इटलीच्या सरकारच्या संपर्कात आहेत आणि तिथल्या सरकारनं त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,' अशी माहिती रणवीर आणि दीपिकाच्या निकटवर्तीयानं वृत्तपत्राला दिली.  

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगबॉलिवूडलग्न