Raju Srivastava Health Update : आपल्या कॉमेडीने सगळ्यांना खळखळून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. गेल्या 10 ऑगस्टला राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच ते कोसळले. तेव्हापासून दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. राजू यांचा ब्रेन जवळपास ‘डेड’ झाल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी पतीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
‘ई टाईम्स’शी संवाद साधताना त्यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. राजू यांची प्रकृती स्थिर आहे. कृपा करून त्यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवू नका. कारण अशा अफवा आमच्यासाठी फारच त्रासदायक आहेत, अशी कळकळीची विनंती त्यांनी यावेळी केली.
राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिनेही वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. पीटीआयशी बातचीत करताना ती म्हणाली, ‘ पापांवर सध्या उपचार सुरू आहेत. सर्व डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत आहेत. याऊपर मी सध्या काहीही बोलू शकत नाही.’‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, काल संध्याकाळी बुधवारी राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अधिक गंभीर झाली होती. डॉक्टरांनी राजू यांच्या ब्रेनमध्ये काही इंजेक्शन दिले आहेत. राजू यांच्या मेंदूच्या वरच्या भागाला ऑक्सिजन मिळत नसल्याचे कळतेय. अद्यापही ते बेशुद्ध असून व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.