रजनीकांत (Rajinikanth) यांचा जेलर हा चित्रपट हिट ठरला होता. आता चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जेलर २' ('Jailer 2' Movie) रिलीजच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्दर्शक नेल्सन यांच्या ॲक्शन एंटरटेनर या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. निर्मात्यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाशी संबंधित माहिती दिली आहे.
प्रॉडक्शन हाउस सन पिक्चर्सने सोशल मीडियावर जेलर २चे पोस्टर शेअर करत अभिनेते रजनीकांत यांच्या व्यक्तिरेखेचं वर्णन केले आहे. त्यांनी लिहिले की, "मुथुवेल पांडियनचा शोध सुरू! ‘जेलर २’च्या शूटिंगला आजपासून सुरूवात होत आहे." या सिनेमाचे शूटिंग आधी चेन्नईत होण्याची शक्यता आहे. यानंतर युनिट गोवा आणि तामिळनाडूतील थेनीसह इतर ठिकाणी शूटिंग करेल अशी अपेक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कन्नड सुपरस्टार डॉ. शिवा राजकुमार आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल 'जेलर २'चा भाग असणार आहेत. मात्र निर्मात्यांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
सन पिक्चर्सने रिलीज केलेल्या 'जेलर २'चा टीझर रेडिओवर एका घोषणेने सुरू होतो की चक्रीवादळ किनाऱ्याकडे जात आहे. तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध आणि दिग्दर्शक नेल्सन गोव्यात मजेदार संवाद करताना दिसले. जेव्हा काही गुंड खोलीत प्रवेश करतात तेव्हा दोघांमधील मजेशीर भांडण अॅक्शनमध्ये बदलते. संगीतकार आणि दिग्दर्शक दोघेही इकडे तिकडे लपण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा रजनीकांत खोलीत प्रवेश करतात, त्यांची प्रतिमा अस्पष्ट होते. रक्ताने माखलेला पांढरा शर्ट घातलेला हा सुपरस्टार एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन प्रवेश करतो. रजनीकांत जेव्हा खोलीतून बाहेर येतात तेव्हा त्यांच्यावर ग्रेनेड फेकला जातो. यानंतर ते खलनायकांशी लढतात. हे दृश्य पाहून स्तब्ध झालेला अनिरुद्ध दिग्दर्शक नेल्सनला म्हणतो, 'हे भयानक दिसतंय नेल्सन! यावर चित्रपट करूया!'
'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि सुमारे ६५० कोटी रुपयांची कमाई करून एक मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता.