Join us

मान्सूनमध्ये सिनेमांचा पाऊस, रसिकांसाठी ४०-४५ सिनेमांची जणू ठरणार मेजवानीच 

By संजय घावरे | Updated: June 18, 2023 12:34 IST

मान्सूनमध्ये यावर्षी जणू चित्रपटांचा पाऊसच पडणार असून, जवळपास ४०-४५ मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

मुंबई : वर्षभर रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांचा झरा दरवर्षी पावसाळा आला की काहीसा आटतो आणि मान्सूनच्या काळात कमी चित्रपट प्रदर्शित होतात. यंदाचा मान्सून मात्र सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. मान्सूनमध्ये यावर्षी जणू चित्रपटांचा पाऊसच पडणार असून, जवळपास ४०-४५ मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

‘आला पावसाळा, तब्येत सांभाळा’ यानुसार पावसाळा आला की, यापूर्वी चित्रपटही काहीसे ‘सेफ मोड’मध्ये जायचे, पण यंदाचे वर्ष याला अपवाद ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जणू सिनेसृष्टी यंदा प्रचंड ताकदीनिशी सज्ज झाली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यातही प्रेक्षकांना मराठी-हिंदीसह हॅालिवूड सिनेमांचीही मेजवानी मिळणार आहे. ‘चौक’, ‘बटरफ्लाय’, ‘फकाट’, ‘मुसंडी’, ‘अम्ब्रेला’, ‘आक्रोश’ या चित्रपटांनंतर आता पावसाळ्यात ‘विठ्ठल माझा सोबती’, ‘बबली’, ‘बाईपण भारी देवा’, ‘आठवणी’, ‘थ्री चिअर्स’, ‘आणीबाणी’, ‘पाहिले मी तुला’, ‘सुभेदार’, ‘पाहिजे जातीचे’ आणि ‘आधारवड’ हे चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत. याखेरीज आणखी काही चित्रपट ऐनवेळी प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. या चित्रपटांवर जवळपास २५ ते ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

यंदा पावसाळ्यामध्ये जवळपास २० हिंदी चित्रपट रिलीज होणार आहेत. मान्सूनपूर्वी ‘जरा हटके जरा बचके’, ‘चिडीयाखाना’, ‘गदर - एक प्रेमकथा’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांनी हजेरी लावली आहे. आता ‘धूमॅन’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘१९२०’, ‘लंडन कॅफे’, ‘परस्त्री’, ‘लफ्जों में प्यार’, ‘७२ हूरें’, ‘अजमेर ९२’, ‘रॅाकी और रानी की प्रेमकहानी’, ‘जेजीएम’, ‘गदर २’, ‘ॲनिमल’, ‘जेलर’, ‘ओ माय गॅाड २’, ‘तारीक’, ‘ड्रीम गर्ल २’ हे चित्रपट भर पावसाळ्यात रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. या सिनेमांखेरीज काहींच्या प्रदर्शनाचे प्लॅनिंग सुरू असल्याने या यादीत आणखी ४-५ चित्रपटांची भर पडू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.२०२१मध्ये जून, जुलै, ऑगस्ट या पावसाळ्याच्या काळात सिनेमागृहे सुरू नव्हती. त्यामुळे एकही सिनेमा रिलीज झाला नव्हता.

-आनंद तिवारी दिग्दर्शित आणि विकी कौशल व ॲमी विर्क अभिनित एक अनटायल चित्रपटही ऑगस्टमध्ये येणार आहे. - कोंकणा सेन शर्मा, आर. बाल्की, सुजॅाय घोष, अमित शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला ‘लस्ट स्टोरीज २’, ‘नीयत’ - नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘टिकू वेड्स शेरू’ हे चित्रपट डिजिटली रिलीज होणार असले तरी त्यांचीही उत्सुकता आहेच. या सर्व चित्रपटांचे एकूण बजेट जवळपास ८०० ते ९०० कोटींच्या आसपास आहे. 

  हॅालिवूडपटांमध्ये ‘स्पायडरमॅन’ आणि ‘ट्रान्सफॅार्मर’मागोमाग ‘द फ्लॅश’ हॅालिवूडपटांच्या चाहत्यांच्या भेटीला आला आहे.   आता ‘इन्सिडीयस’, ‘मिशन इम्पॅासिबल’, ‘ओपनहायमर’, ‘व्हाईट बर्ड’, ‘इंडियाना जोन्स ५’, ‘बार्बी’, ‘द मेग २’, ‘ब्लू बेटल’ हे चित्रपट ऑगस्टपर्यंत रिलीज होतील.   पावसाची पर्वा न करता बऱ्याच निर्मात्यांनी यंदा धाडस करून आपापले चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने मान्सूनमध्ये कमी चित्रपट होण्याची परंपरा यंदा मोडीत निघणार आहे.

काेणत्या चित्रपटांवर नजर असणार'रॅाकी और रानी की प्रेमकहानी', 'ॲनिमल', 'ओ माय गॅाड २', 'ड्रीम गर्ल २'इन्सिडीयस', 'ओपनहायमर', 'व्हाईट बर्ड', या चित्रपटांवर विशेष लक्ष असेल.

पावसाळ्यात यंदा सिनेमागृहांमध्ये चित्रपटांची रेलचेल सुरू राहणार ही आनंदाची बातमी आहे. पावसाळ्यातच नव्हे, पण कोणत्याही ऋतूमध्ये सिनेमा रिलीज करण्याचे धाडस निर्मात्यांनी करायला हवे. यासाठी कंटेंट चांगला देणे गरजेचे आहे. चित्रपट सुपरहिट करायचा की फ्लॅाप हे रसिकांच्या हाती आहे. रसिकांनी नेहमीच चांगले चित्रपट उचलून धरले असल्याने निर्मात्यांना आपल्या कंटेंटवर विश्वास असेल तर पावसाळ्यातही चित्रपट चांगला व्यवसाय करू शकतो.- दामोदर भोयर, केअर टेकर, चित्रा सिनेमा

टॅग्स :सिनेमा