अनेक सेलिब्रिटींकडे महागड्या आणि लक्झरियस कार असतात. काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेतापुष्कर जोगने महागडी कार खरेदी केली होती. पुष्करने रेंज रोव्हर कंपनीची लक्झरियस गाडी खरेदी केली होती. मात्र,अवघ्या पाच दिवसांतच त्याने खरेदी केलेली महागडी कार बिघडली आहे. याबाबत पुष्करने सोशल मीडियावरुन खंत व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.
पुष्कर जोगने लेकीचा हट्ट पुरवत पांढऱ्या रंगाची महागडी रेंज रोव्हर १३ घरी आणली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांतच त्याच्या गाडीचं इंजिनच बिघडलं आहे. पुष्करने याबाबत पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "१३ फेब्रुवारीला मी नवीन कार घेतली होती. त्यानंतर १८ फेब्रुवारीला कारच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचं गाडीतील कॉम्प्युटरवर दाखवलं गेलं. हे अतिशय निराशाजनक आहे. कृपया हे बदलून द्या किंवा त्याची भरपाई द्या", असं पुष्करने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याने या पोस्टमध्ये रेंज रोव्हरच्या अकाऊंटला टॅगही केलं आहे.
पुष्करने कार घेतल्यानंतर एक व्हिडिओ शेअर करत ही खूशखबर चाहत्यांना दिली होती. "आई आणि बाबांचा आशीर्वाद...फेलिशाने मला दुबईत असताना प्रश्न विचारला की डॅडा, तू रेंज रोव्हर कधी घेणार? ही कार तुझ्यासाठी माझी एंजल... ps: हो मराठी कलाकारही रेंज रोव्हर घेऊ शकतात", असं कॅप्शन त्याने दिलं होतं. मात्र काहीच दिवसांत कार खराब झाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे.