लग्नाआधी आणि लग्नाशिवाय स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणं अनेक संस्कृतीत गैर मानलं जातं. पाकिस्तानात अशाच एका रिॲलिटी शोवरून सध्या गदारोळ उठला आहे. हा शो किंवा त्याचा पहिला एपिसोडही अजून प्रसारित झालेला नाही, पण त्यावरून पाकिस्तानात रणकंदन माजलं आहे. अनेक धार्मिक गटांनी याला विरोध केला आहे, त्याला गैर संस्कृतिक ठरवलं आहे आणि सोशल मीडियावर यूझर्सनी या शोला ‘बायकॉट’ करण्याचं आवाहन केलं आहे.
पाकिस्तानात लवकरच सुरू होणाऱ्या या डेटिंग शोचं नाव आहे ‘लजावल इश्क’. या शोचा पहिला एपिसोड यूट्यूबवर २९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या शोमध्ये चार पुरुष आणि चार महिलांना इस्तंबूलमधल्या (तुर्किये) एका आलिशान व्हिलामध्ये एकत्र ठेवलं जाईल. तिथे त्यांची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केली जाईल. स्पर्धक विविध टास्कमध्ये भाग घेतील, मैत्री करतील आणि शेवटी एक कपल विजेता ठरेल. या शोचे १०० एपिसोड बनवले जाणार आहेत. या शोचं सूत्रसंचालन पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर करणार आहे. ‘आस्क अदासी’ आणि ‘लव्ह आयलंड’ या आंतरराष्ट्रीय शोपासून प्रेरणा घेऊन हा शो तयार करण्यात आला आहे असं म्हटलं जात आहे.
या शोचा प्रोमो १५ सप्टेंबरला रिलीज झाला. प्रोमोमध्ये आयशा उमर स्पर्धकांचं स्वागत करताना दिसली. त्यानंतर #BoycottLazawalIshq या हॅशटॅगखाली मोहिमेला सुरुवात झाली. सोशल मीडियावर या शोवर ‘असांस्कृतिक आणि ‘पश्चिमी संस्कृतीची नक्कल’ असा आरोप केला जात आहे. पाकिस्तानी मूल्यांच्या विरोधात असल्याच्या कारणावरून त्यावर जोरदार टीकाही सुरू आहे. काही धार्मिक गटांनी या शोमुळे कौटुंबिक मूल्ये मातीमोल होतील म्हणून त्यावर बंदी आणण्यासाठी कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे.
मात्र, यासंदर्भात पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरीचं (PEMRA) म्हणणं आहे, ‘लजावल इश्क’ हा शो कोणत्याही परवानाधारक टीव्ही चॅनलवर प्रसारित होणार नाही, तर तो यूट्यूबवर प्रसारित होणार आहे, जो आमच्या अधिकारक्षेत्राबाहेर आहे. PEMRAचे प्रवक्ते मुहम्मद ताहिर यांचं म्हणणं आहे, आमच्याकडे यूट्यूब रेग्युलेट करण्याचा अधिकार नाही. लोकांना याची जाणीव नाही की ही सामग्री आमच्या नियंत्रणाखाली येत नाही.
अभिनेत्री आयशा उमरनं मात्र या शोचं समर्थन केलं आहे. ती म्हणते, हा शो म्हणजे कोणताही सांस्कृतिक धक्का नाही. याऊलट पाकिस्तानी आणि उर्दू भाषिक प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा आणि अनोखा प्रयोग आहे. हा शो प्रेम, मैत्री आणि स्पर्धेचं मिश्रण आहे, जो प्रेक्षकांना भावनिक आणि नाट्यमय अनुभव देईल. खऱ्या नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या शोद्वारे करण्यात येणार आहे. हा शो ‘लव्ह आयलंड’ची नक्कल नाही आणि पाकिस्तानी संस्कृतीवरच हा शो बेतलेला आहे. ‘लव्ह आयलंड’ हा डेटिंगवर आधारित रिॲलिटी शो आहे, जिथे पुरुष आणि महिलांना एकत्र ठेवलं जातं, त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात आणि प्रेक्षकांच्या मतदानावर स्पर्धकांचं अस्तित्व अवलंबून असतं. स्पर्धकांमधील प्रेम आणि नात्यांना चालना देणं, ड्रामा, रोमान्स आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणं हे या शोचं उद्दिष्ट आहे. हा शो २०१५ मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झाला होता.