अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि गायक निक जोनास (Nick Jonas) यांची जगभरात 'आऊटस्टँडिंग कपल' (Outstanding Couple) अशी ओळख आहे. फक्त सांस्कृतिकच नाही तर त्यांच्या वयातही खूप अंतर असूनही प्रियंका आणि निक सध्या सुखी संसार करत आहेत. २०२२ मध्ये ते आई -बाबा झाले होते. सरोगसीच्या माध्यमातून १५ जानेवारी २०२२ रोजी मालतीचा जन्म झाला होता. मालती ही आता तीन वर्षाची झाली आहे. मालतीच्या जन्मापासून नीक आणि प्रियंका तिच्यावर उत्तम संस्कार करत आहेत. आताही दोघांनी लाडक्या लेकीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.
नुकतंच 'द केली क्लार्कसन' या शोमध्ये मालती शोबिजमध्ये एन्ट्री करणार का? असा प्रश्न निकला करण्यात आला होता. यावर त्याने हा निर्णय पुर्णपणे मालतीचा असेल असं सांगितलं. "आम्ही यावर भरपूर विचार केलाय. मनोरंजन हे एक चांगलं करिअर आहे. पण, तिला काय करायचं हे मालतीच ठरवेल. आम्ही नाही", असं निक म्हणाला. तसेच मालतीला गाणं गायला आणि ऐकायला खूप आवडतं असंही त्यानं सांगितलं.
पुढे त्यानं म्हटलं, "मी आणि प्रियंकाने करिअरमध्ये बऱ्याच गोष्टींचा सामना केलाय. त्यामुळे आमच्या मुलीनेही त्याच गोष्टी पाहाव्यात, असं आम्हाला वाटत नाही. मुलांचं संरक्षण करणं हे आईवडिलांचं काम असतं. पण, त्यासोबतच त्यांना त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेण्याचं आणि मुक्तपणे भरारी घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे". प्रियंका आणि निकने २०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात मुंबईत साखरपुडा केला होता. त्यानंतर दोघांनी राजस्थानच्या उदयपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर १५ जानेवारी २०२२ मध्ये मालतीचा जन्म झाला.